

दत्ता भोसले
वडगाव निंबाळकर: विवाह जुळविण्याच्या खटपटीत अनेक कुटुंबांची खुलेआम लूट होत असली, तरी ते एका आशेवर नवीन एजंटाच्या शोधात राहतात. त्यातून फसवणूक पुढे सुरूच राहते. अल्पभूधारक, बेरोजगार यांना टार्गेट करण्याचे प्रमाण यात सर्वाधिक आहे. अशा विवाहेच्छुक मुलांची परिस्थिती सध्या खूपच केविलवाणी झाली आहे.
घरी अर्धा ते एकरभर जमीन. त्यात बहीण-भावंडांची वाटणी. सोबतीला पशुपालन किंवा एखादा लघुद्योग जोडीला. हे सर्व असताना देखील ही कुटुंबे सुखीसमाधानी जीवन जगतात. रोज कष्ट करायचे, हा त्यांचा शिरस्ता. त्यांच्या जीवनाविषयीच्या अपेक्षाही खूप मर्यादित आहेत. आहे त्या परिस्थितीला सामोरे जात ते जगतात. त्यांच्या विवाहविषयक अपेक्षाही फारशा नाहीत, तरीही अनेक मुलांचे लग्न जमत नाही. ज्यांचे लग्न एजंटांच्या माध्यमातून जमते ती वधू काही दिवसांतच चुना लावून पसार होते.
वधूकडील मंडळींच्या अपेक्षा आजकाल वाढल्या आहेत. त्यात ही अल्पभूधारक, बेरोजगार मंडळी कुठेच बसत नाहीत. परिणामी, लग्नासाठी त्यांना डावलले जाते. त्यातून असे लग्नाळू युवक मानसिक तणावात जीवन जगत आहेत. काही प्रमाणात त्यातून व्यसनाधीनता वाढते आहे. अशा युवकांसोबत चर्चा केली असता काही बाबी प्रकर्षाने जाणवल्या. फक्त मुलगी मिळावी, बाकी लग्नाचा खर्च, इतर सर्व खर्च आम्ही करतो, आम्हाला संसारोपयोगी साहित्य नको, भांडीकुंडी नकोत, विवाहासाठी प्रसंगी कर्ज काढतो, असे या युवकांचे म्हणणे आहे. मुलींच्या लोकांना देखील आम्ही काही रक्कम लग्नकार्यासाठी खर्च म्हणून द्यायला तयार आहोत, अशी तयारीसुद्धा या युवकांची आहे.
अनेक युवक आज घटस्फोटित, विधवा महिलेशी लग्न करायला तयार आहेत. अशा महिलांना अगोदरचे काही अपत्य असेल तर त्याचाही स्वीकार करायला विवाहेच्छुक तरुण तयार आहेत. परंतु, तरीही त्यांचे लग्न एजंटांच्या चक्रात अडकले आहे. सर्व ठिकाणाहून त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.
काही युवक लागताहेत वाममार्गाला
अशा दुष्टचक्रामुळे काही युवक वाममार्गाला लागत आहेत. चुकीच्या पद्धती अवलंबत आहेत. हा मोठा धोका यापुढे समाजापुढे कायम राहणार आहे. अशी मुले गुन्हेगारी कृत्याकडे वळली तर त्यातून सामाजिक परिस्थिती बिघडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, एजंटवर्गाने हाच वर्ग आपल्या टार्गेटवर ठेवला आहे. कारण, हे एक सॉफ्ट टार्गेट आहे, जे पोलिसांत तक्रार करण्याची शक्यता अगदीच कमी असते. शिवाय, लोकलज्जेस्तव फसवणूक झाली तरी ही मंडळी त्याचा बोभाटा करीत नाहीत. ते एजंटांच्या पथ्यावरच पडते. परिणामी, फसवणुकीचे हे चक्र सुरूच राहते.