Suresh Kalmadi Political Legacy: सबसे बडा खिलाडी… सुरेशभाई कलमाडी; पुण्याच्या राजकारणावर अधिराज्य गाजवणारा नेता

काँग्रेसचा सुवर्णकाळ, अपार सत्ता, वादळे आणि अस्त — कलमाडींच्या राजकीय प्रवासाची कहाणी
Suresh Kalmadi
Suresh KalmadiPudhari
Published on
Updated on

सुनील माळी

स्वातंत्र्यानंतरच्या तब्बल चार दशकांमध्ये एका निवडणुकीचा अपवाद वगळता पुण्याच्या महापालिकेवर काँग्रेसला वर्चस्व निर्माण करणे जमले नव्हते, पण १९९२ मध्ये प्रथमच काँग्रेसला स्वबळावर महापालिकेत झेंडा लावता आला आणि त्यानंतर सलग पंधरा वर्षे तो फडकत ठेवता आला याला कारणीभूत ठरले ते मुख्यत: सुरेश कलमाडी यांचे नेतृत्व. स्थानिक नेतृत्वाबरोबरच प्रदीर्घ काळ दिल्लीत पुण्याचे प्रतिनिधीत्व करताकरताच रेल्वेमंत्रिपदाच्या अवघ्या दोन वर्षांच्या मिळालेल्या संधीत दाखवलेली चमक आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनातून दिसलेले संघटनकौशल्य यांमुळे या अष्टपैलू, धुरंधर व्यक्तिमत्त्वाला उद्देशून केली जाणारी घोषणा सार्थ ठरते... 'सबसे बडा खिलाडी..., सुरेशभाई कलमाडी...'

Suresh Kalmadi
Chandrashekhar Bawankule : 70 हजार कोटींच्या प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही

सुरेशभाई म्हणजे झंझावात आणि वेग... पायलटचे काम करताना सुरेशभाईंना वेगाची आणि उत्तुंग स्थान गाठण्याची सवयच लागली आणि राजकारणातही तीच सवय कायम राहिली. त्यामुळेच पुण्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्षपद १९७७ मध्ये त्यांच्याकडे आल्यावर लगेचच पुढच्याच वर्षी राज्य युवक अध्यक्षपदालाच त्यांनी गवसणी घातली. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्याने त्यांच्याबरोबर सुरेशभाई समाजवादी काँग्रेसमध्ये गेले आणि १९८१ ते ८६ या काळात समाजवादी काँग्रेसच्या युवक अध्यक्षपदाची धुरा सांभा‌ळली. या पायलटला राजकारणातली ती उंचीही लवकरच खुजी वाटली अन ते १९८२ मध्ये थेट राज्यसभेवर निवडले गेले. राज्यसभेवर १९८२ ते १९९६ असा प्रदीर्घ चौदा वर्षांचा कालखंड झाल्यावर १९९६ मध्ये त्यांनी प्रथमच लोकसभेची निवडणूक लढवली आणि दिमाखात विजयी झाले. आणखी उंचीवर जाण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांना १९९५ मध्ये रेल्वेराज्यमंत्रिपद मिळाले. ते दोनच वर्षे टिकले तरी त्या काळात त्यांनी रेल्वेचा पुणे विभाग सुरू केला. त्याचा पुण्याला चांगलाच फायदा झाला.

Suresh Kalmadi
Pune Crime : दिरानेच केला वहिनीचा खून, घर व जमिनीचा वाद; जुन्नरच्या निमगिरीतील घटना

देशाला स्वातंत्र्य मिळाले ते १९४७ मध्ये आणि त्यानंतरच्या काही दशकांमधील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला पुण्यात पराभवाची चव फारच कमी वेळा चाखायला मिळाली, पण आश्चर्य म्हणजे महापालिकेच्या निवडणुकांत मात्र मतदार काँग्रेसला बहुमत देण्यास नकार देत होते आणि नागरी संघटनेसारख्या संघटनेला निवडून देत होते. हीच स्थिती १९६७ चा अपवाद वगळता १९९२ पर्यंत होती. त्यानंतर मात्र सुरेशभाईंच्या नेतृत्वाने काँग्रेसला सत्तेकडे नेले. १९९२, १९९७ आणि त्यानंतरची २००२ अशा तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसने शानदार विजय मिळवला आणि महापालिकेची सत्ता स्वत:कडे राखली. तो पुण्याच्या काँग्रेसचा सुवर्णकाळ होता आणि त्याचे बहुतांशी श्रेय त्यांचे कट्टर विरोधकही सुरेशभाईंनाच देतील. अर्थात हे त्यांचे यश असे आकाशातून उडून त्यांच्या पुढ्यात पडलेले नव्हते तर शहराच्या संघटनेवर त्यांची जबरदस्त पकड त्याला कारणीभूत होती. शहराच्या प्रत्येक भागातला लहानमोठा कार्यकर्ताही त्यांच्या नजरेतून सुटत नसे. एखादा कार्यकर्ता पसंत पडला की त्याला ते भरभरून देत, पण एखाद्यावर ते नाराज झाले की त्याला शेवटपर्यंत काही मिळत नसे. विशेषत: निवडणुकीच्या वेळी तर त्यांचा अखंड फोनसंपर्क असे. वलय असलेल्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे आकर्षित झालेली कार्यकर्त्यांची फौजच त्यांच्या आगेमागे असे. अगदी झोपडपट्टीतील कार्यकर्त्यापासून ते वेगवेगळ्या समाजांच्या, धर्मांच्या कार्यकर्त्यांना वेचून काढून त्यांना संधी देणे, हे सुरेशभाईंचे वैशिष्ट्य होते. शिवा मंत्री, अली सोमजी, हिरामण शिंदे, माऊली शिरवळकर, आबा बागुल, अविनाश साळवे, बाळासाहेब अमराळे, दत्ता सागरे, बाळासाहेब मारणे, नारायण चव्हाण अशी अनेक नावे त्यात घेता येतील. केवळ कलमाडी यांच्यामुळेच संधी मिळालेले अनेक कार्यकर्ते पदाधिकारी झाले.

Suresh Kalmadi
Pune Ward 9 PMC: प्रभाग ९ मध्ये पूनम विधाते यांच्या पाठीशी महिलांची भक्कम ताकद; प्रचारात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

पुण्याच्या काँग्रेसच्या स्थानिक राजकारणात प्रदीर्घ काळ एकमुखी नेतृत्व होते ते सुरेशभाईंचे. 'कलमाडी बोले, अन काँग्रेस हाले', 'कलमाडी बोले अन महापालिका हाले' असेच या कालखंडाबाबत म्हणावे लागेल. महापालिकेतील महापौर, स्थायी समिती अध्यक्षपदापासून ते साध्या समितीच्या अध्यक्ष-सदस्यपदापर्यंतच्या कुठल्याही पदावर कुणी बसायचे, ते कलमाडी ठरवत. या पदांसाठी पक्षाचा कोण उमेदवार आहे ?, हे सांगणारे पाकीट त्यांच्या घरून निघे आणि महापालिकेच्या सभागृहनेत्याच्या दालनात येऊन फुटे. कलमाडी दिल्लीहून येणार असले तर विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी महापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या आलिशान गाड्यांची चाके लोहगावच्या रस्त्याकडे धावू लागत. नगरसेवकांची बैठक काँग्रेस भ‌वनवर नव्हे तर कलमाडी हाऊसवर होई. कलमाडी हाऊस हेच काँग्रेस हाऊस झाले होते. सुरेशभाई हे उत्तम क्रीडासंघटक. त्यामुळे महापालिकेच्या अर्थसंकल्पात पोहण्याचे तलाव, सिंथेटिक ट्रँक, क्रीडा स्पर्धा आदींसाठी भरपूर तरतूद असे. त्यांनी सुरू केलेली आंतरराष्ट्रीय मँरेथॉन स्पर्धा आज एक नावाजलेली स्पर्धा ठरली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत नावाजला गेलेला, परदेशी पर्यटकांपासून ते देशातील विख्यात कलावंतांपर्यंतच्या सर्वांची पायधूळ झाडला जात असलेला गणेशोत्सव काळातला पुणे फेस्टिव्हल गेल्या तीनहून अधिक दशके पुण्याचे आकर्षण ठरतो आहे.

Suresh Kalmadi
MPED MED CET Registration 2026: एमपीएड व एमएड सीईटी 2026 नोंदणीला सुरुवात; 20 जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज

... अर्थात, मध्यानीचा सूर्य हळूहळू अस्ताकडे जातोच, त्याप्रमाणे कोणत्याही साम्राज्याला उतार असतोच. पुण्यातल्या कलमाडी सत्तेचा उतार कधीतरी येणारच होता. काँग्रेस श्रेष्ठांशी मतभेद झाल्याने १९९६ च्या लोकसभा विजयानंतर त्यांना पक्ष सोडावा लागला. लोकसभेच्या १९९७ च्या निवडणुकीत चक्क भारतीय जनता पक्ष-शिवसेना यांच्या पाठिंब्यावर पुणे विकास आघाडीच्या झेंड्याखाली त्यांनी निवडणूक लढवली. बहुसंख्य नगरसेवकांनीही कलमाडींपाठोपाठ काँग्रेस सोडून या आघाडीत प्रवेश केल्याने काँग्रेस भवन रिकामे झाले. तरी सामान्य काँग्रेसजन एक झाले आणि कलमाडी यांना अभूतपूर्व पराभवाला सामोरे जावे लागले. कालांतराने ते पुन्हा पक्षात परतले. महापालिकेच्या २००७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसशी आघाडी करणे शक्य असतानाही 'कलमाडी यांना पुणे महापालिकेतून सत्तेपासून दूर ठेवायचेच', या निश्चयाने राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप-शिवसेना यांनी वेगळीच आघाडी केली अन काँग्रेस १९९२ पासून प्रथमच सत्तेपासून दूर झाला...

Suresh Kalmadi
Pune Health Department Bribe Case: बदलीसाठी तीन लाखांची लाच! पुणे जिल्हा परिषद आरोग्यसेवक अटकेत, उपसंचालक अडचणीत

... अनेक निवडणुकांच्या निकालानंतर कलमाडी यांच्या भोवती कार्यकर्त्यांचा गराडा असायचा आणि कलमाडी हाऊस गजबजून जायचे, पण २००७ च्या निवडणुकीचा निकाल लागला त्या दिवशी विजयाच्या आशेने मांडलेल्या सत्तर-ऐंशी खुर्च्यांची रांग तशीच मोकळी राहिली आणि तिच्या मध्यभागी एकटेच उभे असलेले कलमाडी हे दृश्य कायम नजरेसमोर राहील... त्यांच्या नेतृत्वाखाली २०१० मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमधील खरेदीत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून कलमाडींना २०११ मध्ये अटक झाली आणि तब्बल दहा महिने ते तुरूंगात होते. त्यानंतर त्यांची सुटका झाली खरी आणि २०१२ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करून काँग्रेसला सत्तेत घेतले खरे, पण त्यात सुरेशभाई कुठेच नव्हते...

... देशपातळीवरची अन स्थानिक पातळीवरची राजकीय कारकीर्द संपलेले कलमाडी कधी कुणाच्या लग्नात भेटत, पण अगदीच दोन-तीन मोजक्या कार्यकर्त्यांशिवाय त्यांच्या बरोबर कुणी नसे. तेव्हा आधीच्या काळातील मोठ्या लवाजम्यासह ये-जा करणाऱ्या सुरेशभाईंचे चित्र आठवत असे... अखेरच्या काळात त्यांना दुर्धर आजाराने गाठले. भेटणाऱ्याला ते लगेच ओळखतही नसत. त्या आजारातच त्यांचा सोमवारी रात्री अंत झाला. त्यांच्या अंत्यदर्शनाला आलेल्या त्यांच्या एकेकाळच्या समर्थकांना आपणच हात वर करकरून दिलेल्या घोषणा आठवत राहिल्या... सबसे बडा खिलाडी, सुरेशभाई कलमाडी...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news