

पिंपरी : अजित पवार जे बोलत आहेत, ते खूप अभिमानास्पद नाही. 70 हजार कोटींच्या गैरव्यवहाराचे प्रकरण न्यायालयात चालू आहे. अद्याप त्याचा निकाल लागलेला नाही, असा सूचक इशारा भाजपचे नेते तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे.
महसूलमंत्री बानवकुळे हे महापालिकेतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी शहरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या सत्तेतील 9 वर्षांच्या काळातील भ्रष्टाचारावर तोफ डागली आहे. तसेच, 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजपसोबत आता मी बसतो, असे वक्तव्य केले होते. अजित पवार यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. त्यावर मंगळवारी बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
बावनकुळे म्हणाले की, अजित पवार जे बोलत आहेत, ते खूप अभिमानास्पद नाही. 70 हजार कोटींच्या गैरव्यवहाराचे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. त्याचा निकाल अजून लागलेला नाही. निकाल लागेल, त्यानंतर पुढे जाता येईल. अजित पवार प्रल्गभ नेते आहेत, त्यांनी किमान अशा गोष्टींवर बोलू नये. त्यांनी महापालिकेसारख्या छोट्या निवडणुकीत भ्रष्टाचाराचे मुद्दे काढणे योग्य नाही. युतीमध्ये मतभेद व मनभेद करू नयेत. अजित पवार त्याचा विचार करतील.
बोलता येण्यासारखे खूप काही
बोलता येण्यासारखे खूप काही आहे. अजित पवार पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनेक वर्षे सत्तेत होते. मागील पाने उलटली, तर त्यांना बोलता येणार नाही. त्यामुळे पाने उलटायची आमची काही इच्छा नाही. समन्वय समितीत ठरल्याप्रमाणे यापुढे अजित पवार वागतील, अशी अपेक्षा बावनकुळे यांनी व्यक्त केली.