

पुणे: कोल्हापूर आरोग्य परिमंडळातून पुणे परिमंडळात आरोग्यसेवकाच्या बदलीसाठी तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्यसेवक रामकिसन गंगाधर घ्यार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यानंतर सुरू झालेल्या चौकशीत आरोपी आणि उपसंचालक डॉ. भगवान पवार यांचा फोनवरून बरेचदा संपर्क आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे डॉ. पवार यांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांची चौकशी होणार आहे. दरम्यान, डॉ. पवार सोमवारी तातडीने मुंबईला रवाना झाल्याचे समजते.
तक्रारदार आरोग्यसेवकाची गेल्या वर्षी जून महिन्यात पुण्यात बदली झाली. त्याने इंदापूरमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त पदी बदलीसाठी अर्ज केला होता. परंतु, डॉ. भगवान पवार यांनी तक्रारदाराला नवीन प्रशासकीय इमारतीतील आरोग्य उपसंचालक कार्यालयात रुजू करून घेतले. घ्यार हा कर्मचारी डॉ. भगवान पवार यांच्या संपर्कातील असून, त्याला भेटण्याबाबत डॉ. पवार यांनी सांगितल्याची नोंद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. आरोपी घ्यार यानेही चौकशीत ‘साहेबां’च्या सांगण्यावरून व्यवहार केल्याची कबुली दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
तक्रारदाराने डॉ. पवार यांच्याकडे बदलीच्या ऑर्डरसाठी वारंवार विनंती केली. मात्र, त्याला वेगवेगळी कारणे सांगून उपसंचालक कार्यालयात थांबवून घेतले. त्याला इतक्या महिन्यांचा पगारही देण्यात आला नाही. तक्रारदाराचे वडील आजारी असल्याने त्यांच्यावरील उपचारांसाठी चार-पाच लाख रुपये खर्च झाला होता. त्यामुळे पुन्हा बदलीसाठी पैसे भरावे लागतील, असे समजल्यावर त्याच्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले.
दरम्यान, अटक केलेल्या आरोपीने त्याच्या मागे पैशांसाठी तगादा लावला होता. अखेर आरोपीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला आणि संबंधित प्रकरण समोर आले. डॉ. भगवान पवार कोरोना काळात पुणे जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. तेव्हापासून आरोपी डॉ. पवार यांच्या मर्जीतील असल्याचे बोलले जाते. याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी डॉ. भगवान पवार यांना फोन केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
नेमके काय घडले?
तक्रारदार बदलीबाबत विनंती करण्यासाठी डॉ. भगवान पवार यांच्याकडे गेला असता, त्यांनी ‘राम’ला जाऊन भेट असे सांगितले. ऑगस्टमध्ये भेट झाल्यापासून त्यांनी वारंवार वेगवेगळी कारणे देत बदली रोखून धरली. त्याच दरम्यान, 18 बदल्यांची ऑर्डर काढल्याचे समजले. शेवटी नाईलाजाने तक्रारदार घ्यार याच्याकडे गेला. त्याने तीन लाख रुपये लागतील, असे सांगितले. कारवाईदरम्यान पुणे विभागातील बदल्यांसाठी तीन एजंट कार्यरत असल्याचे समजले. सध्या इतर एजंट रडारवर आहेत. कारवाईमध्ये डॉ. पवार यांचाही जबाब नोंदवला जाणार आहे.