

लेण्याद्री : घर व जमिनीच्या कारणावरून वाद घालून चाकूने वार करून सख्ख्या दिराने भावजयीचा निर्घृण खून केला. जुन्नर तालुक्यातील निमगिरी गावात सोमवारी (दि. ५) सांयकाळी ६ वाजता ही खळबळजनक घटना घडली.
अरुणा शरद साबळे (वय ३८) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अरुणा यांचे पती शरद निंबा साबळे (रा. ४४) यांनी जुन्नर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार तुषार निंबा साबळे (वय ४८) या खून करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणा साबळे या त्यांच्या घराच्या अंगणात काम करत होत्या. या वेळी तेथे त्यांचा दीर तुषार साबळे हा आला. त्याने घर व जमिनीच्या कारणावरून वाद घातला. काही वेळाने हातातील चाकूने अरुणा यांच्या छातीवर, हातावर वार करून त्यांना ठार मारले आहे. त्यानंतर तो तेथून पळून गेला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पसार झालेल्या तुषारचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार करून रवाना केली. पोलिस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे हे गुन्ह्याचा तपास करत आहेत.