

पुणे : पांढऱ्या रंगाच्या पेहरावात अन् जॅकेटमध्ये मतदारांशी संवाद साधणाऱ्या, मतदारांना नमस्कार करणाऱ्या अन् पक्षाचे नाव आणि चिन्ह असलेले उपकरणे घालून मतदारांशी भेटीगाठी करणाऱ्या उमेदवारांची छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर झळकत आहेत.
कारण उमेदवारांच्या सोशल मीडियावरील प्रचारासाठी छायाचित्रांचाही प्रभावीपणे वापर केला जात आहे. सोशल मीडियासाठी उमेदवारांनी पंधरा दिवसाआधीच विविध थीमवर छायाचित्रकारांकडून खास फोटोशूट करून घेतले आहेत. त्यातील छायाचित्रे इन्स्टाग्राम, फेसबुक गाजत आहेत. इतकेच नव्हे, तर रोजच्या प्रचारफेऱ्या, सभा, मतदारांशी भेटीगाठी, प्रचार मोहिमांची छायाचित्रे टिपण्यासाठीही उमेदवारांच्या टीममध्ये दोन छायाचित्रकारांचा समावेश करण्यात आला असून, त्यांनी काढलेली प्रचारांची छायाचित्रे सोशल मीडियावर अपलोड करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे उमेदवारांची कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) तयार केलेली छायाचित्रेही लक्ष वेधत आहेत.
महापालिकेच्या निवडणुकांचा महत्त्वाचा भाग म्हणजे प्रचार... आता उमेदवारांकडून आपापल्या प्रभागात जोरदार प्रचार सुरू असून, प्रचारासाठी सोशल मीडियाचे माध्यम मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. रील्स आणि व्हिडिओ शूट केले जात आहेतच. पण छायाचित्रांवरही भर दिला जात आहे. निवडणुकीसाठी उमेदवारांनी खास तयारी केली असून, त्याचाच एक भाग म्हणून उमेदवार व्यावसायिक छायाचित्रकारांकडून खास फोटोशूट करून घेत आहेत. हीच छायाचित्रे आता उमेदवारांच्या अधिकृत इन्स्टाग्राम, फेसबुक पेजवर त्यांच्या सोशल मीडिया टीममार्फत अपलोड करण्यात येत आहेत. ही छायाचित्रे रिक्षावर लावलेल्या पोस्टरवरही झळकत आहेत. प्रचार मोहिमांची छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
याविषयी छायाचित्रकार निखिल जगताप म्हणाले, काही उमेदवारांना विविध थीमनुसार स्टुडिओमध्ये फोटोशूट करून दिले आहेत. याशिवाय प्रचार फेरी, सभा, मतदारांशी भेटीगाठी, प्रचार मोहिमांचीही छायाचित्रे टिपत आहे. प्रचारासाठी छायाचित्रांनाही उमेदवार प्राधान्य देत आहेत. प्रचारातील रोजच्या घडामोडींची छायाचित्रे सोशल मीडियावर अपलोड केली जात आहेत.
प्रचार मोहिमांमधील छायाचित्रे अपलोड करण्यात येत आहेतच. पण कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) तयार करण्यात आलेली छायाचित्रेही सोशल मीडियावर गाजताहेत. मतदारांशी संवाद साधताना आणि मतदारांशी हस्तांदोलन करताना... अशी विविध प्रकारची छायाचित्रे एआयद्वारे तयार करून घेतली जात असून, या छायाचित्रांची सध्या धूम आहे.
आम्ही चार उमेदवारांचे सोशल मीडियावरील प्रचाराचे काम पाहत आहोत. आमच्या टीममध्ये व्हिडीओग्राफर, दोन छायाचित्रकार, ग्राफिक डिझायनर, एडिटर आणि सोशल मीडिया एक्स्पर्टचा समावेश आहे. प्रचार फेरी, सभा, मतदारांशी भेटीगाठी, प्रचार मोहिमांची छायाचित्रे आमच्या टीममधील छायाचित्रकार काढत आहेत आणि त्यांनी काढलेली छायाचित्रे सोशल मीडियावर आम्ही अपलोड करत आहोत. तसेच उमेदवारांचे फोटोशूटही केले असून, उमेदवारांच्या अधिकृत इन्स्टाग्राम, फेसबुक पेजवर ही छायाचित्रे अपलोड करत आहोत. प्रचारासाठी व्हिडिओ, रील्ससोबत छायाचित्राच्या माध्यमाचा प्रभावीपणे करण्यात येत आहे.
राजवर्धन वांजळे, सोशल मीडिया एक्स्पर्ट
रंगबिरंगी साड्या, पक्षाचे चिन्ह असलेले बॅज आणि उपरणे अशा पेहरावात महिला उमेदवार फोटोशूट करून घेत आहेत, तर पुरुष उमेदवारांचा कल कुर्ता-पायजमा, खादी कुर्ता-शर्ट आणि जॅकेट अशा पेहरावासह हटके स्टाइल आणि विविध पोझमध्ये फोटोशूट करून घेण्याकडे आहे. विशेष म्हणजे तरुण उमेदवार तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी जीन्स-टी-शर्टमध्येही फोटोशूट करत आहेत. उमेदवारांना हव्या त्या पोझमध्ये आणि पेहरावात छायाचित्रे काढून देण्यात येत आहेत. काहींनी तर विजयी झाल्यानंतरचेही फोटोशूट करून घेतले आहेत. फ्लेक्ससाठीची काहींनी छायाचित्रे काढून घेतली आहेत.