

पुणे : मतदानासाठी अवघे पाच दिवस शिल्लक असताना शहरात निवडणुकीच्या प्रचाराने जोरदार वेग घेतला आहे. उमेदवारांमध्ये पदयात्रा, रॅली, वैयक्तिक भेटी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रचाराचा धडाका उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी लावला आहे.
प्रभागातील विविध नागरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून थेट मोबाईल क्रमांक जाहीर करून मतदारांच्या अडचणी जाणून घेण्यावर भर दिला जात आहे. काही उमेदवारांनी तर समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी कार्यकर्त्यांची स्वतंत्र फळीच कामाला लावली आहे. त्यामुळे प्रचारासोबतच समस्या सोडविण्याचा सपाटाही सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
उमेदवारांच्या घरातील महिलावर्गाकडून महिला मेळावे आयोजित करण्यात येत असून, त्यातून महिला मतदारांशी थेट संवाद साधला जात आहे. रिक्षांवर ध्वनिक्षेपक, प्रमुख चौकांमध्ये होर्डिंग्ज, इमारतींवर झळकणारे बॅनर, यामुळे शहरातील विविध प्रभाग निवडणूकमय झाले आहेत.
उच्चभ्रू वस्ती, गावठाण आणि झोपडपट्टी भागांचा समावेश असलेल्या प्रत्येक प्रभागात उमेदवारांकडून वैयक्तिक भेटींवर विशेष भर देण्यात येत आहे. नागरिकांचे प्रश्न ऐकून घेऊन ते सोडविण्याची ग्वाही उमेदवारांकडून दिली जात असून, त्याला कार्यकर्त्यांची भक्कम साथ मिळत आहे.
दरम्यान, सोशल मीडियावरही प्रचाराने वेग घेतला असून व्हिडीओ, पोस्टर, रील्स आणि थेट संवादाच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरण्यात येत आहेत. एकंदरीत, शहरात उमेदवार आणि कार्यकर्ते भल्या पहाटेपासून प्रचाराच्या रणांगणात उतरल्याचे चित्र सध्या दिसत आहे.