

पुणे : घोरपडे पेठ-गुरुवार पेठ-समताभूमी प्रभाग क्र. 26 हा विविधतेत एकता जपणारा प्रभाग असून, सर्व समाजांना समान न्याय, समान संधी आणि समान विकास देणे, हेच आपले ध्येय आहे. धर्म, जात किंवा भाषा यापलीकडे जाऊन माणुसकी आणि विकासाच्या मुद्द्यांवर आम्ही काम करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग््रेासचे उमेदवार गणेश कल्याणकर यांनी सांगितले.
महापालिका प्रभाग क्र. 26 मधील राष्ट्रवादीच्या उमेदवार विजय ढेरे, सीमा काची, रूपाली पाटील यांच्या प्रचारार्थ मोमीनपुरा परिसरात भव्य पदयात्रा पार पडली. या पदयात्रेत विविध धर्म, समाज आणि घटकांतील नागरिकांनी एकत्र येत सर्वधर्मसमभावाचा प्रभावी संदेश दिला.
रॅलीदरम्यान बोलताना उमेदवार गणेश कल्याणकर म्हणाले की, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, रस्ते, शिक्षण आणि युवकांच्या रोजगाराच्या संधी, या विषयांवर सर्वसमावेशक विकास साधण्याचा आपला निर्धार त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक घटकाला सोबत घेऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर राष्ट्रवादीच्या चारही उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. या रॅलीमुळे मोमीनपुरा परिसरात सलोखा, ऐक्य आणि विकासाचा सकारात्मक संदेश पसरला असून, प्रभाग क्रमांक 26 मध्ये परिवर्तनाची चाहूल लागल्याचे चित्र दिसून येत आहे.