

वेल्हे : सिंहगड राजगड गडकोटांसह पानशेत वरसगाव गुंजवणी खडकवासला धरण परिसरात थंडीची लाट असली तरी त्याची पर्वा न करता रविवारी (दि. ७) सिंहगड, राजगड किल्ल्यावर पर्यटकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
खडकवासला धरण तिरावरील पुणे - पानशेत रस्त्यावर पर्यटकांनी गर्दी केली होती. सिंहगड किल्ल्यावर वाहनाने आलेल्या पर्यटकांकडून दिवसभरात ९० हजार ४५० रुपयांचा टोल वसूल करण्यात आला.
सिंहगड वन विभागाचे वनपरिमंडळ अधिकारी समाधान पाटील म्हणाले, रविवारी गडावर पर्यटकांची दुचाकी ४४२ व चारचाकी ३१६ वाहने गेली. त्यांच्या कडून घेरा सिंहगड वन व्यवस्थापन समितीच्या वतीने ५३ हजार ७०० रुपयांचा उपद्रव शुल्क (टोल) घेण्यात आला. शनिवार व रविवार या दोन दिवसात पर्यटकांकडून जवळपास १ लाख रुपयांचा टोल वसूल करण्यात आला. यासह दोन मद्यपी पर्यटकांवरही कारवाई करण्यात आली.
वनरक्षक बळीराम वायकर व नितीन गोळे वन व्यवस्थापन समितीच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन केले. गेल्या दोन आठवड्यापासून सिंहगड पानशेत राजगड परिसरात थंडी सुरू आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने सिंहगडच्या चोहोबाजूंच्या सह्याद्रीच्या डोंगररांगा हिरवाईने नटल्या आहेत.
रविवारी दिवसभरात सिंहगडावर वीस हजारांवर पर्यटकांनी हजेरी लावली. घाट रस्त्यावर सकाळ पासुनच वाहनांची वर्दळ सुरू होती. घाट रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी काही काळ टप्प्या टप्प्याने वाहतूक बंद करण्यात आली.
राजगड किल्ल्यावर दिवसभरात पाच हजारांहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली. राजगडावर विविध संस्थांच्या ३०० हून अधिक स्वयंसेवकांनी स्वछता केली.