

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीच्या माध्यमातून कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट्स, डिझाईन्स अँड ट्रेडमार्क विभागाअंतर्गत पदभरती करण्यात येणार आहे.
या भरतीअंतर्गत एकूण १०२ पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. अर्ज प्रक्रिया १३ डिसेंबरपासून सुरू होईल आणि १ जानेवारी २०२६ पर्यंत सुरू राहील. उमेदवारांना यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in किंवा upsconline.nic.in वर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी लागेल.
ट्रेडमार्क एक्झामिनर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी किंवा संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा १ जानेवारी २०२६ रोजी उमेदवारांचे वय २१ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. मात्र, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील अनुसूचित जाती, जमातींसाठी ५ वर्षे, इतर मागासवर्गीयांसाठी ३ वर्षे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल, दिव्यांगांसाठी योग्य सूट देण्यात आली आहे.
या पदभरतीमध्ये सर्वात जास्त पदे ट्रेडमार्क आणि भौगोलिक निर्देशांक परीक्षकांसाठी आहेत, ज्यांची संख्या १०० आहे. ही पदे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या विभागांतर्गत येतात. या व्यतिरिक्त उपसंचालक (परीक्षा सुधारणा) साठी दोन पदे देखील भरली जातील. बौद्धिक संपदा कायदा आणि प्रशासकीय सुधारणांमध्ये तज्ज्ञ असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.