

खेड : राजगुरुनगर लगतच्या तिन्हेवाडी, (ता. खेड) येथील श्रीकृष्ण मंदिराच्या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे.रविवारी (दि ७) पहाटे दोन वाजता येथील आश्रमातील कुत्र्याला बिबट्याने उचलुन नेले. कुत्रा गायब झाल्यावर सकाळी येथील सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यात दोन वाजता चित्रित झालेला प्रकार समोर आला .
याबाबत महानुभाव पंथाचे प्रेरक आणि आश्रम प्रमुख किसनमहाराज टेंभुर्णीकर यांनी सांगितले की, तिन्हेवाडी गावठाणलगत आणि टेकडीच्या पायथ्याला श्रीकृष्ण मंदिर आणि लागूनच आश्रम आहे. येथे गेले आठ दिवस मध्यरात्री बिबट्या येत असल्याचे निदर्शनास आले.
माहिती मिळताच गावातील नागरिक व आश्रमातील अनुयायी यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गावच्या सरपंच प्रतीक्षा पाचारणे, उपसरपंच विठ्ठल वरकड, प्रभागाच्या सदस्य कविता सचिन सांडभोर यांना याबाबत माहिती दिली.त्यांनी वनविभागाला कळवले. त्यानंतर येथे पिंजरा लावण्यात आला.त्यात भक्षही ठेवण्यात आले.
मात्र पिंजरा लावला त्यानंतर बिबट्या तिकडे फिरकलाच नाही. उलट दुसऱ्या बाजूला खंडू भागा आरुडे , ज्ञानेश्वर रेवजी आरुडे यांच्या घराच्या परिसरात बिबट्या आढळून आला. सतत बिबट्या येत असल्याने पिंजरा शनिवारी (दि ६) त्या ठिकाणी नेण्यात आला. रविवारी मध्यरात्री बिबट्याने पुन्हा मंदिराकडे धाव घेतली. येथील पाळीव कुत्रा जबड्यात उचलुन नेला. या पार्श्वभूमीवर तिन्हेवाडीतील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन सरपंच प्रतीक्षा पाचारणे, माजी उपसरपंच रंगनाथ आरूडे यांनी केले आहे. -