

चाकण : खेड तालुक्यातून हद्दपार झालेला बहुचर्चित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प पुन्हा खेडमध्ये येण्याची शक्यता आता पूर्णपणे मावळली आहे.
खेडमधून पुरंदरला गेलेल्या विमानतळ प्रकल्पासाठीची भूसंपादन प्रक्रिया निर्णायक टप्प्यावर आली आहे. त्यामुळे पुन्हा हा प्रकल्प खेड तालुक्यात येईल अशी आशा असलेल्या नागरिक, एमआयडीसीमधील उद्योजक आणि विकसकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.
प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यावर आल्याचे अधिकारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे. पुरंदरमधील विमानतळ उभारणीसाठी संपादित करावयाच्या जमिनीच्या मोबदल्याचा दर निश्चित करण्यासाठी येत्या सोमवारी (दि. ८) महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत जमिनीचे मूल्यांकन आणि शेतकऱ्यांना द्यायचा अंतिम मोबदला ठरवला जाणार असल्याने, प्रकल्पाला गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे जिल्ह्यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, भूसंपादनाच्या मोबदल्यावरून शेतकऱ्यांमध्ये अनेक महिन्यांपासून चर्चा आणि मागणी होती. शेतकऱ्यांचे समाधान होईल आणि प्रकल्पाच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही, यासाठी प्रशासनाकडून मोबदल्याची रक्कम निश्चित करण्यावर भर दिला जात आहे.
पुरंदर विमानतळ हा पुणे महानगराच्या विकासासाठी आणि औद्योगिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाकडून जमिनीच्या मोबदल्याचा अंतिम आकडा निश्चित झाल्यावर, लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. ८ डिसेंबर रोजी होणारी ही बैठक विमानतळ प्रकल्पाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.