पुणे : भुसारी कॉलनीत उमेदवारांची निवड हाच कळीचा मुद्दा

पुणे : भुसारी कॉलनीत उमेदवारांची निवड हाच कळीचा मुद्दा

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : प्रभाग क्रमांक 32 मध्ये (भुसारी कॉलनी – सुतारदरा) सर्वच राजकीय पक्षांची काही भागात ताकद असल्याने महिलांसाठीचे आरक्षण आणि उमेदवारांची निवड हाच येथे कळीचा मुद्दा ठरणार आहे. नव्या प्रभागातील काही संभाव्य प्रमुख इच्छुक हे लगतच्या प्रभागातूनही निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवार ठरल्यानंतरच येथील राजकीय चित्र स्पष्ट होईल.

जुना प्रभाग क्रमांक दहामधील (बावधन, कोथरूड डेपो) 85 टक्के, तर जुना प्रभाग 11 मधील (रामबाग कॉलनी, शिवतीर्थनगर) 15 टक्के (सुतारदरा) एकत्रित करून नवीन प्रभाग 32 (भुसारी कॉलनी सुतारदरा) तयार झाला आहे. जुन्या प्रभाग दहामधील विद्यमान नगरसेवक अल्पना वरपे, श्रद्धा प्रभुणे पाठक, किरण दगडे, दिलीप वेडे पाटील हे भाजपचे आहेत. मात्र, त्यांच्यापैकी काहीजण लगतच्या प्रभागातून निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत. प्रभाग अकरामधील काँग्रेसचे नगरसेवक रामचंद्र ऊर्फ चंदूशेठ कदम हेदेखील प्रभाग 32 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

जागा खुल्या राहिल्यास आघाडीचा जोर

महाविकास आघाडी झाली आणि आरक्षणानंतर प्रभागातील दोन जागा सर्वांसाठी खुल्या राहिल्यास आघाडीचे उमेदवार भाजपपुढे मोठे आव्हान उभे करू शकतील. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगरसेवक शंकर उर्फ बंडू केमसे, माजी नगरसेविका जयश्री मारणे आणि काँग्रेसचे कदम आघाडीतर्फे प्रमुख इच्छुक आहेत. मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे हेही या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील.

भाजपकडून इच्छुक उमेदवारांमध्ये विद्यमान नगरसेवक अल्पना वरपे, श्रद्धा प्रभुणे पाठक, किरण दगडे, दिलीप वेडे पाटील, तसेच अभिजित राऊत, संदीप कुंबरे, स्वाती शरद मोहोळ, सचिन पवार, नीलेश कोंढाळकर, दत्ता भगत, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून बंडू केमसे, जयश्री मारणे, साधना डाकले, विजय डाकले, राकेश मारणे हे प्रमुख आहेत. मनसेकडून माजी नगरसेवक किशोर शिंदे, पुष्पा कनोजिया, तसेच रमेश उभे, प्रशांत कनोजिया, ओंकार तुपे, सुभाष आमले, नितीन गायकवाड निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. शिवसेनेकडून अविनाश दंडवते, पराग पासलकर, चंद्रकांत शिंदे, आनंद भिलारे, अंकुश तिडके यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसकडून चंदूशेठ कदम, किशोर मारणे यांच्या नावाची चर्चा आहे.

महिलांचे आरक्षण पडल्यास गणिते बदलणार

प्रभागातील तीनपैकी दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्यास येथील राजकीय गणिते बदलतील. दिग्गज आजी-माजी नगरसेवक समोरासमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे. त्यावेळी काहीजण लगतच्या प्रभागातून त्यांचे नशीब आजमावतील. भाजपमधील प्रमुख इच्छुक लगतच्या प्रभागात गेल्यास या प्रभागात त्यांचे पॅनेल कसे असेल त्यावरच येथील लढतीचे चित्र निश्चित होईल.

अशी आहे प्रभागरचना

भुसारी कॉलनी, सुतारदरा, दत्तनगर, सुतारदादा नगर, म्हातोबानगर, पंडित भीमसेन जोशी उद्यान, डावी भुसारी कॉलनी, चिंतामणी पॅरेडाईज, मंगलधाम सोसायटी, नवभूमी, शास्त्रीनगरचा भाग, सौदामिनी अपार्टमेंट, वेदविहार सोसायटी-2, जिजाईनगर, महात्मा सोसायटी, वृंदावन सोसायटी, इंदिराशंकर नगरी हा भाग या प्रभागात आहे.

  • लोकसंख्या – 67127
  • अनुसूचित जाती – 6582

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news