

पुणे: सनईवर लोकेश आनंद यांनी सादर केलेला राग मुलतानी, डॉ. चेतना पाठक यांनी सुरेल गायकीतून रंगवलेला राग भीमवंती, रितेश आणि रजनीश मिश्रा बंधूंचे बहारदार सहगायन, पं. शुभेंद्र राव आणि त्यांच्या पत्नी सास्किया राव-दे-हास यांच्या सतार आणि चेलो सहवादनाची पर्वणी अन् पं. उल्हास कशाळकर यांच्या अनुभवसंपन्न गायकीने 71 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सुरेल रंग भरले. गायन - वादनाच्या आविष्काराने अन् रसिकांच्या उदंड प्रतिसादात बुधवारी (दि. 10) महोत्सवाची दमदार सुरुवात झाली. रसिकांच्या गर्दीने खऱ्या अर्थाने महोत्सवाची सुरुवात झाल्याची प्रचिती दिली.
परंपरेप्रमाणे जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील सवाई गंधर्व यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित 71 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला बुधवारी सुरुवात झाली. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडा संकुल येथे आयोजित या महोत्सवाच्या सुरुवातीला स्वरमंडपात दिवंगत कलाकारांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
महोत्सवाचे पहिले स्वरपुष्प गुंफले ते दिल्लीस्थित लोकेश आनंद यांनी. त्यांच्या मंगलमय सनई वादनाने महोत्सवाची सुरेल सुरुवात झाली. त्यांनी राग मुलतानी सादर केला. त्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली. सुरुवातीचा विलंबित एकतालातील वादन विस्तार श्रवणीय होता. त्यानंतर पं. जसराज यांची ‘आये मोरे साजनवा’ ही रचना (द्रुत एकताल) त्यांनी ऐकवली. रसिकांच्या आग््राहाखातर त्यांनी केहरवा तालात बनारसी धून पेश केली. त्यानंतर स्वरमंचावर आगमन झाले ते किराणा घराण्याच्या गायिका डॉ. चेतना पाठक यांचे. त्यांनी राग भीमवंती (भीमपलास आणि मधुवंती यांचे मिश्रण) सादर करून रसिकांची मने जिंकली. ‘गाऊ मै हरीनाम’ आणि ‘लागे मोरे नैन’ (द्रुत त्रिताल) या यांसह डॉ. प्रभा अत्रे यांच्या विविध रचना आणि त्याला जोडून तराणा (एकताल), यांचे सादरीकरण अतिशय प्रभावी झाले. राग मांजखमाजमधील ‘बलमा नें चुराई निंदिया’ हा दादरा पेश करून त्यांनी सादरीकरणाचा समारोप केला.
महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप पं. उल्हास कशाळकर यांच्या स्वराविष्काराने झाला. त्यांनी सादर केलेल्या हमीर रागाचे सूर स्वरमंचावर निनादले आणि अनुभवसंपन्न गायकीचे दर्शन घडवले. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. पं. शुभेंद्र राव आणि त्यांच्या पत्नी सास्किया राव-दे-हास यांच्या सतार आणि चेलो सहवादनाने रसिकांची मने जिंकली. सवाई महोत्सवाच्या स्वरमंचावर सादरीकरण करणे हा आमच्यासाठी भावनिक क्षण होता, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मूळच्या नेदरलँडच्या असलेल्या सास्किया यांनी महोत्सवात वादनाची संधी मिळणे हे आनंद देणारे आहे. मला नेहमीच भारतीय संगीताबद्दल जाणून घ्यायचे होते. त्यामुळेच संगीताशी नाते जुळले आणि मी चेलो वादनाकडे वळले. मी आणि शुभेंद्र एकत्र सहवादन करतो हाच आमच्यासाठी आनंदाचा क्षण असतो, असे सांगितले.
मिश्रा बंधूचे रंगतदार सहगायन...
बनारस घराण्याचे गायक आणि पं. राजन मिश्रा यांचे पुत्र-शिष्य असलेल्या रितेश आणि रजनीश मिश्रा या मिश्रा बंधूंचे सहगायन झाले. त्यांच्या सहगायनाने पं. राजन आणि पं. साजन मिश्रा यांच्या सहगायनाचे स्मरण रसिकांना करून दिले. आपल्या भावना व्यक्त करताना मिश्रा यांनी काही आठवणी जागवल्या. मिश्रा यांनी समयोचित राग श्री सादर केला. त्यानंतर त्यांनी विविध रचना सादर करीत रसिकांची मने जिंकली.सतार आणि चेलो सहवादन ठरले रसिकांसाठी पर्वणी...
रसिकांना ज्या सादरीकरणाची सर्वाधिक उत्सुकता होती, त्या पं. शुभेंद्र राव व त्यांच्या पत्नी सास्किया राव-दे-हास यांच्या सतार व चेलो अशा सहवादनाने रसिकांना खिळवून ठेवले. सतार आणि चेलो सहवादनासाठी या कलाकार जोडप्याने राग हेमंत निवडला होता. सतारीचे झंकार रसिकांच्या परिचयाचे असले तरी भारतीय चेलो या वाद्याचा नाद रसिकांसाठी अनोखा होता. सास्किया यांनी चेलो या वाद्यातून विविध नादांचा अनुभव दिला. ‘एकला चलो रे...’ ही धून एकत्रित सादर करत या रंगलेल्या सादरीकरणाची सांगता झाली.
महोत्सवातील आजचे सादरीकरण
(गुरुवारी, 11 डिसेंबर)
हृषिकेश बडवे (गायन)
इंद्रायुध मजुमदार (सरोदवादन)
पद्मा देशपांडे (गायन)
जॉर्ज बुक्स (सॅक्सोफोनवादक) आणि पं. कृष्णमोहन भट (सतार) यांचे सहवादन