

पुणे: भाजपमधून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली होती. तब्बल अडीच हजारांहून अधिक इच्छुकांनी अर्ज घेऊन ते भरून जमा करायला सुरूवात केली आहे. अर्ज स्वीकृतीसोबतच भाजपने इच्छुक उमेदवारांचा प्रभागनिहाय सर्व्हे प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या उमेदवारात जिंकण्याची क्षमता असेल तसेच स्थानिक नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे? याचा अभ्यास करून तिकिटांचे गणित निश्चित होणार आहे. विरोधी गटातील अनेक इच्छुक देखील भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी देखील अर्ज नेल्याची माहिती आहे. तर शिंदे सेनेतील एका माजी मंत्र्यांच्या मुलाने देखील अर्ज नेल्याची माहिती आहे. 80 टक्के पक्षातील तर 20 टक्के बाहेरील इच्छुकांना संधी देण्याचा फॉर्म्युला भाजपने ठरवला असून, येत्या आठवड्यात पक्षाबाहेरील इच्छुकांचा प्रवेश होत असल्याची माहिती आहे.
आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक पातळीवर तयारीला वेग दिला असून, शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी प्रभागनिहाय पदाधिकारी बैठकींची मालिका सुरू केली आहे. बुधवारी प्रभाग क्रमांक एक ते आठच्या बैठका पार पडल्या. पुढील चार दिवसात उर्वरित प्रभागाच्या बैठका होणार आहेत. या बैठकींच्या माध्यमातून प्रभागस्तरावरील राजकीय व संघटनात्मक तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात येत आहे.
या बैठकीत बूथरचना मजबुतीकरण, कार्यकर्त्यांची संघटनात्मक बांधणी, निवडणूक व्यवस्थापनाचे नियोजन, तसेच प्रत्येक प्रभागातील पूर्ण झालेली व प्रगतीपथावरील विकासकामे यावर सविस्तर चर्चा करण्यात येत आहे. यासोबतच आगामी काळात प्रभागात राबविण्यात येणाऱ्या नव्या आणि आवश्यक विकासकामांची रूपरेषा ठरवली जात आहे. नागरिकांकडून थेट येणाऱ्या समस्या, स्थानिक पातळीवरील अडचणी, तसेच मतदारांच्या अपेक्षा समजून घेण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात येत आहे. या सर्व मुद्द्यांच्या आधारे आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा तयार करण्याच्या प्रक्रियेला दिशा देण्याचे काम या बैठकीतून केले जात असल्याचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले. भाजपने विरोधी पक्षातील इच्छुकांनाही सामावून घेण्यासाठी पक्षाची दारं खुली ठेवली आहेत.
विरोधक देखील भाजपमधून लढण्यास इच्छुक
भाजपच्या कार्यालयात अर्ज घेण्यासाठी पहिल्याच दिवशी झालेल्या गर्दीत अनेक आश्चर्यचकित करणारी नावे दिसून आली. अजित पवार गट, शरद पवार गट तसेच काँग््रेासमधील काही पदाधिकाऱ्यांनीही भाजपकडून उमेदवारी अर्ज घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भाजपच्या दारात उमटणाऱ्या या ‘विरोधी’ पावलांमुळे महापालिका रणधुमाळीत नवे राजकीय पेच निर्माण झाले आहेत.
शिंदे सेनेतील माजी मंत्र्यांचा मुलगा भाजपमधून लढण्यास इच्छुक
मागील सरकारमध्ये मंत्री असलेले तानाजी सावंत यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यात त्यांच्या मुलाने भाजपकडे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपच्या पुणे शहर कार्यालयात प्रवक्ते केशव उपाध्ये यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच बाहेर तानाजी सावंत यांच्या जे.एस.पी.एम संस्थेची कार थांबली होती. त्यात सावंत यांच्या संस्थेतील कर्मचारी होते व त्यांच्याजवळ गिरीराज सावंत यांचा भाजप उमेदवारीचा अर्ज होता. हा अर्ज अतिशय गोपनीय पद्धतीने दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे.
भाजप निष्ठावंतांचे वाढणार ब्लडप्रेशर
तब्बल 165 जागांसाठी तब्बल 2500 इच्छुकांनी अर्ज भरून दिले आहेत. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड असताना 80/20 टक्क्यांचा फॉर्म्युला वापरण्यात येणार असल्याची माहिती खुद्द भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी दिली. त्यामुळे 20 टक्क्यांमध्ये राष्ट्रवादी, काँग््रेास, आरपीआय आणि शिंदे गटातील सक्षम उमेदवारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे निष्ठावंत बाजूला आणि बाहेरचे उमेदवार आत अशी स्थिती निर्माण झाल्याने भाजप निष्ठावंतांचे ब्लडप्रेशर वाढणार आहे.