

पिंपरखेड: शिरूर तालुक्यातील बेट भागात बिबट्यांची दहशत वाढत असताना वनविभागाला बिबटे पकडण्यात सलग यश मिळत आहे. चांडोह येथे अनेक दिवस पिंजऱ्याला हुलकावणी देणारा तब्बल 9 वर्षांचा नर बिबट्या बुधवारी (दि. 10) पहाटे अखेर जेरबंद झाला, तर पिंपरखेडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी गावठाण परिसरात दहशत पसरवणारा आणखी एक बिबट्या मंगळवारी (दि. 2) रात्री पिंजऱ्यात अडकला. या दोन्ही मिळून मागील 24 तासांत चांडोह व पिंपरखेड येथे 3 बिबटे जेरबंद झाले आहेत.
मागील 2 महिन्यांत या परिसरात एकूण 24 बिबटे जेरबंद झाले असले तरी वन्यप्राण्यांचा वावर आणि भीती अद्याप कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. चांडोह येथे शेतकरी दत्ता गोविंद वडणे यांच्या शेतात बिबट्याचा वावर वाढल्याने वनविभागाने पिंजरा लावला होता. शेतजमिनी व पशुधनाला धोका निर्माण झाल्याने ग््राामस्थांनी सातत्याने पिंजऱ्यांची मागणी केली होती. अखेर बुधवारी पहाटे बिबट्या पिंजऱ्यात अडकला. हा बिबट्या सुमारे 9 वर्षांचा असून, या भागात आढळलेला सर्वाधिक वयोमानाचा बिबट आहे.
पिंपरखेड गावठाण व स्मशानभूमी परिसरात मुक्त संचार करून दहशत निर्माण करणारा बिबट्याला घोड नदीकाठी संतोष सोनवणे यांच्या वीटभट्टीजवळ लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी रात्री 11 वाजता जेरबंद करण्यात आले.
हा बिबट 7 वर्षांचा नर असल्याची प्राथमिक माहिती आहे. जेरबंद झालेल्या दोन्ही बिबट्यांना माणिकडोह बिबट निवारण केंद्रात सुरक्षितपणे हलविण्यात आले, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी दिली.
32 पिंजरे बसवण्याचे काम सुरू
जांबूत, पिंपरखेड, फाकटे आणि चांडोह परिसरात सध्या 32 पिंजरे कार्यरत असून, बिबट्यांचा वावर दिसेल त्या त्या ठिकाणी तत्काळ पिंजरे उभारण्याचे काम सुरू असल्याचे वनविभागाने सांगितले. ही मोहीम सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी नीलकंठ गव्हाणे, वनरक्षक लहू केसकर, महेंद्र दाते आणि बेस कॅम्पचे जवान हे राबवत आहेत.