

रामदास डोंबे
खोर: सध्या सर्वत्र लग्नसराई जोरात सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून सोहळ्यांचा खर्च झपाट्याने वाढत आहे. त्यात मध्यमवर्गीय कुटुंब मोठ्या प्रमाणात भरडले जात असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे महागाईने बजेट कोलमडले असताना दुसरीकडे कथित प्रतिष्ठेसाठी मोठ्या प्रमाणात कर्ज काढले जाते. तसेच सोशल मीडियाच्या काळात तरुणाईसुद्धा विवाह समारंभ मोठा खर्च करण्यासाठी कचरताना दिसत नाही. परिणामी अनेक कुटुंबे कर्जाच्या ओझ्याखाली दबली जात आहेत. यातून एका दिवसाचा लग्न सोहळा आनंदाऐवजी आयुष्यभराच्या आर्थिक ताणाचे कारण बनत आहे.
एकेकाळी गावांमध्ये पाच ते सात लाखांत लग्न सोहळा सहज उरकला जायचा. परंतु आज अन्नदर, डेकोरेशन, हॉलभाडे, केटरिंग, मेकअप, फोटोग््रााफी, संगीत, मेहंदी तसेच हॉटेल, फॉर्महाऊस यांसारख्या नव्या ट्रेंडमुळे सरासरी खर्च दहा ते पंधरा लाखांपर्यंत पोहोचला आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक कुटुंबे लग्नासाठी व्यक्तिगत कर्ज, सोन्याचे गहाण, सहकारी बँकांकडून कर्ज या मार्गांचा अवलंब करत आहेत.
इंस्टाग््रााम रील्स, सिनेमॅटिक व्हिडीओ, डेस्टिनेशन फोटोज, थीम बेस्ड डेकोरेशन या गोष्टी आता बहुतेक लग्नात कॉमन झाल्या आहेत. तुमच्या मुलीच्या लग्नाला काय विशेष, हा प्रश्न नातेवाईक व समाजातून विचारला जातो. या दबावातून मध्यमवर्गीयही परवडत नसलेली पॅकेजेस घेताना दिसतात. एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी 1 ते 2 लाखांची फोटोग््रााफी, व्हिडीओग््रााफी टीम ही आता नित्याची बाब झाली आहे.
हुंड्याचे नवे रूप
लग्नात हुंडा कायद्याने बंद आहे. पण प्रत्यक्षात गिफ्ट, सेट, डेकेरेशन योगदान, गाडी अशा नव्या नावाखाली मुलाच्या कुटुंबाकडून खर्चाची अपेक्षा वाढली आहे. ग््राामीण भागात तर लग्नाच्या नावाखाली मुलीच्या आई-वडिलांवर प्रचंड दबाव निर्माण होतो. अनेक ठिकाणी मुलीच्या लग्नासाठी पालक जमिनी विकतानाही दिसतात.
हॉटेल-फॉर्महाऊसचा हट्ट
दौंड, सासवड, बारामती परिसरात मोठ्या प्रमाणावर विवाह लॉन्स, रिसॉट्र्स, फॉर्महाऊस वाढले आहेत. एकाच दिवशी 2 ते 4 लाख रुपये भाडे, डेकोरेशन वेगळे, साऊंड वेगळा, केटरिंग वेगळे म्हणून खर्च प्रचंड फुगतोय. उत्पादन खर्च व महागाई वाढल्याने सामान्य कुटुंब आर्थिकदृष्ट्या खड्ड्यात पडत आहे. काही कुटुंबे लग्नानंतरही किमान 4-5 वर्षे हप्ते भरत असल्याचे चित्र आहे.
आर्थिक सल्लागारांच्या मते लग्नावर केलेला खर्च परत मिळत नाही. सामाजिक दडपणामुळे लोक आवश्यकता नसलेले खर्च करतात. 80 टक्के कुटुंबे लग्नाचा बजेट ओलांडतात. लग्नानंतर कर्जामुळे नवदांपत्याच्या आयुष्यावर ताण निर्माण होतो. दिखाऊ स्पर्धेमुळे लग्नाचा थाट वाढवताना मध्यमवर्गीयांचा कंबरडे मोडत आहे.
नवदाम्पत्याचे भविष्य महत्त्वाचे
काही तरुण जोडपी एकत्रितपणे खर्च कमी करण्याचा निर्णय घेतानाही दिसत आहेत. यामध्ये लहान फंक्शन्स, मर्यादित पाहुणे, साधे डेकोरेशन, नोंदणी विवाह, छोटा रिसेप्शन या कल्पनांमुळे खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. विवाह सोहळा हा दोन्ही कुटुंबांसाठी आनंदाचा क्षण असतो. परंतु तोच आता आर्थिक धोका बनत चालला आहे. दिखाऊपणा नाही, तर स्थिर भविष्य महत्त्वाचे. हा संदेश समाजात पसरवण्याची आज नितांत गरज निर्माण झाली आहे, असे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.