

Loni Kalbhor woman injured in gas leak
लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील नेहरू चौकात घरगुती गॅस सिलिंडरची गळती होऊन झालेल्या स्फोटात एक महिला गंभीर जखमी झाली. तर स्फोटाने घराची खिडकी रस्त्यावर फेकली जाऊन ती दुचाकीस्वाराला लागली. यामध्ये तो देखील जखमी झाला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून शेजारच्या इमारतीलाही हादरा बसला आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे सरपंच नागेश काळभोर यांनी उपस्थित राहून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. स्फोटानंतर परिसरात गोंधळ उडाला आणि नागरिक मोठ्या प्रमाणात जमा झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जगताप यांच्या घरी स्वयंपाकाचा गॅस रेग्युलेटर चालू राहिल्याने गॅस घरात पसरला. घरातील महिला बाथरूममधील गॅस गिझर चालू करण्यासाठी गेल्यानंतर झालेल्या स्पार्कमुळे स्फोट झाला. स्फोटाच्या धक्क्याने खिडकी फुटून बाहेर फेकली गेली आणि दुचाकीस्वारास दुखापत झाली.
शेजाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आणि रेग्युलेटर बंद केला. दरम्यान, पाषाणकर गॅस एजन्सीचे कर्मचारीही पोहोचून सर्व आवश्यक उपकरणे सुरक्षितपणे बंद करण्यात आली. या दुर्घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.