पुणे : गायीच्या दूध खरेदी दरात आजपासून वाढ

पुणे : गायीच्या दूध खरेदी दरात आजपासून वाढ

पुणे : पुढारी वृत्तसेवा

राज्यात पावडर व बटरच्या दरातील वाढीनंतर दरपातळी स्थिरावली असली तरी तुटवडा जाणवू लागल्यामुळे गायीच्या दूध खरेदीचा दर प्रतिलिटर 3 रुपयांनी वाढून तो 33 रुपये होणार आहे. तर विक्री दरातही प्रतिलिटर 2 रुपये वाढ केल्याने हा दर 50 ते 52 रुपये होईल. ही दरवाढ आजपासून (मंगळवार) सुरू झाली आहे.

राज्य दूध उत्पादक प्रक्रिया व व्यावसायिक कल्याणकारी संघाची बैठक सोमवारी (दि.14) रात्री झाली. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के होते. बैठकीला सहकारी आणि खासगी दूध ब्रॅण्डचे मिळून 55 सभासद उपस्थित होते. या बैठकीत गायीच्या दूध खरेदीसह विक्री दरातही वाढ करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे दूध उत्पादक शेतकर्यांना दिलासा मिळताना ग्राहकांनाही दरवाढीच्या झळा बसणार आहेत.

बैठकीनंतर दै. 'पुढारी'ला माहिती देताना संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के म्हणाले की, उन्हाळ्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत दुधाचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यातच पावडर आणि बटरच्या सततच्या दरवाढीनंतर दरपातळी आता स्थिरावली आहे. मात्र, दुसरीकडे पशुखाद्य, वैरणीचे दर वाढलेले आहेत. कोरोनामुळे शेतकर्यांना गायीच्या दुधाला अपेक्षित दर मिळाला नाही. या सर्व बाबींचा विचार करून गायीच्या 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ गुणप्रतिच्या दुधाच्या दरात तीन रुपये वाढ करीत हा दर 30 वरून 33 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मध्यंतरी दूध विक्री दरात मोजक्याच दूध ब्रॅण्डधारकांनी वाढ केली होती. आता सरसकट दूध विक्री दरात दोन रुपये वाढ करण्यात आली आहे. ज्या दूध संघाच्या गायीच्या दुधाचा विक्री दर 48 रुपये होता तो आता 50 रुपये आणि ज्यांचा विक्री दर 50 रुपये होता तो 52 रुपये होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news