

पुणे: चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी जप्त केलेल्या सोन्यावर अन्य कोणीही दावा केलेला नाही. न्यायालयापुढे सादर कागदपत्रांवरून अर्जदार प्रथमदर्शनी हक्कदार असल्याचे स्पष्ट असल्याचे निरीक्षण नोंदवत जप्त सोने चार कोटी रुपयांच्या हमीपत्रावर कारागिराला तात्पुरत्या ताब्यात देण्याचे न्यायालयाने दिले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अलिशा बागल यांनी हा आदेश दिला. त्यानुसार, पुणे पोलिसांनी जप्त केलेले सोने सराफाच्या स्वाधीन केले.
याप्रकरणात, दागिन्यांचे कारागीर मोहम्मद तौफिक रज्जाक खान यांनी ॲड. राकेश उत्तेकर आणि ॲड. संग्राम परदेशी यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला होता. खान यांचा सोन्याचे दागिने घडविण्याचा व्यवसाय आहे. सराफा व्यावसायिकांनी दागिने तयार करण्यासाठी दिलेले सोने त्यांच्या दुकानातून चोरीला गेले होते.
खडक पोलिसांनी आरोपींकडून ते हस्तगत केले. मात्र, सोने पोलिसांच्या ताब्यात राहिल्यास व्यवसायाचे आर्थिक नुकसान होईल, असा युक्तिवाद ॲड. उत्तेकर आणि ॲड. परदेशी यांकडून करण्यात आला. सोन्याच्या पावत्या, प्राप्तिकर विवरणपत्रे आणि दुकानाच्या परवान्यासह सादर पुराव्यांची न्यायालयाने दखल घेतली. तपास अधिकारी आणि सरकारी पक्षानेही सोने परत देण्यास हरकत दर्शविली नाही. त्यामुळे न्यायालयाने अटींसह अर्ज मंजूर करत सोने परत करण्याचे आदेश दिले.
या अटींवर सोने स्वाधीन
सोन्याच्या वस्तूंचा मूळ आकार अथवा रंग बदलण्यास मनाई.
परवानगीशिवाय सोन्याची विक्री किंवा तृतीय पक्षाचा हक्क निर्माण करता येणार नाही.
न्यायालय, खडक पोलिसांनी मागणी केल्यास सोने सादर करावे लागणार.
ताबा पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात राहणार.
जप्त केलेल्या सोन्यामुळे सराफाचा व्यवसाय अडचणीत येऊ नये, ही आमची प्रमुख भूमिका होती. मालकीसंबंधी कागदपत्रे न्यायालयासमोर सादर केली. त्यांची दखल घेऊन न्यायालयाने दिलेला आदेश अर्जदारासाठी दिलासादायक आहे. गुन्ह्याचा तपास सुरू असतानाही योग्य अटींवर जप्त मालमत्ता तात्पुरती परत मिळू शकते हे आदेशातून स्पष्ट झाले.
ॲड. राकेश उत्तेकर आणि ॲड. संग्राम परदेशी.