

पुणे: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शहरातील कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील महात्मा गांधी रस्ता आणि अन्य ठिकाणच्या २० हॉटेल्स व रेस्टॉरंटवर छापा मारून तपासणी केली. यामध्ये अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळलेल्या आठ हॉटेल्सचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले. या वेळी स्वयंपाकघरातील कमालीची अस्वच्छता, किड्यांचा मोठ्या प्रमाणावरील प्रादुर्भाव तसेच काही ठिकाणी कृत्रिम रंग आणि अतिरिक्त मोनोसोडियम ग्लुटामेटचा (एमएसजी) वापर होत असल्याचे तपासणीत निदर्शनास आल्याने परवाने निलंबित करण्यात आले असल्याचे एफडीएकडून स्पष्ट करण्यात आले.
अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी स्वयंपाकघरातील स्वच्छतेचा अभाव आणि अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर त्रुटी आढळून आल्या. विशेषतः किड्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असूनही स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले. या आठ आस्थापनांवर कारवाईअन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुढील आठ आस्थापनांचे परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले आहेत.
अन्न, औषध विभागातील पुण्याचे सहाय्यक आयुक्त श्रीकांत करकळे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली असून, अन्न सुरक्षा अधिकारी नारायण सरकटे, सतीश हाके, प्रिया राजगोळकर, दीपाली घोडके आणि पूजा बागडे यांचा समावेश होता. या पथकाने विविध आस्थापनांची तपासणी करून अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही हॉटेल किंवा खाद्यपदार्थ विक्रीच्या आस्थापनाला अभय दिले जाणार नाही.
परवाने निलंबित केलेले हॉटेल्स
मेट्रो रेस्टॉरंट, पुणे स्टेशन
सहाना व्हेज रेस्टॉरंट
शिवाय कॉर्नर, पुणे स्टेशन
ग्रँड दिल्ली दरबार हॉस्पिटॅलिटी इंडिया प्रा. लि., कॅम्प
राजे चायनीज फास्ट फूड अँड ज्यूस बार, बाबाजान चौक कॅम्प
कॅफे ट्यून्स द बर्गर बार्न कॅफे, एम. जी. रोड, कॅम्प
महादेव फूड्स, ससाणेनगर, हडपसर
फिरोज केटरर्स, एनआयबीएम, कोंढवा खुर्द
अन्न साठवणूक आणि परवान्याच्या अटींचे पालन न करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही.
श्रीकांत करकळे, सहआयुक्त, एफडीए