Bopodi Khadki Traffic: कोट्यवधी खर्चून रस्ता रुंदावला; तरीही बोपोडी-खडकीत वाहतूक कोंडी

सर्व्हिस रोडवर पार्किंग, पदपथांवर वाहनांचा ताबा; मेट्रो स्थानकांसमोरील बेशिस्त वाहतुकीचा वाहनचालकांना फटका
Bopodi Khadki Traffic
Bopodi Khadki TrafficPudhari
Published on: 
Updated on: 

शंकर कवडे

पुणे: रुंद आणि प्रशस्त रस्ता... दुतर्फा हिरवाई... मध्यभागातून धावणारी मेट्रो... स्थानिक वाहतुकीसाठी स्वतंत्र सर्व्हिस रोड अन् पादचाऱ्यांसाठी पदपथ! मुंबई आणि पिंपरी-चिंचवडकडून बोपोडीमार्गे पुण्यात प्रवेश करताना शहराच्या प्रवेशद्वाराला साजेशा पायाभूत सुविधा आता नजरेस पडतात. एकेकाळी अरुंद रस्त्यामुळे वाहनांच्या रांगा लागणाऱ्या या मार्गाचे कोट्यवधी रुपये खर्चून रुंदीकरण केल्याने पूर्वीचा ‘बॉटलनेक’ मोठ्या प्रमाणात दूर झाला. मात्र, रस्ता प्रशस्त झाल्यानंतरही वाहनचालकांची बेशिस्त, अनधिकृत पार्किंग आणि वाहतूक नियोजनातील त्रुटींमुळे उपलब्ध रस्त्याची पूर्ण क्षमता वापरली जात नसल्याचे दै. ‘पुढारी’च्या पाहणीत समोर आले.

Bopodi Khadki Traffic
Nira Left Canal Water Shortage: २२ फाटा परिसरातील शेती संकटात! आवर्तन वेळेत न सुटल्याने शेतकऱ्यांचे गणित कोलमडले

संत तुकाराम महाराज पूल ओलांडल्यानंतर बोपोडीमार्गे पुणे शहरात प्रवेश होतो. पुढे खडकी, अंडी उबवणी केंद्र, रेंजहिल्स, वाकडेवाडीमार्गे शिवाजीनगरपर्यंत हा मार्ग जातो. मुंबईसह पिंपरी-चिंचवडकडून पुण्यात येणाऱ्या वाहनांसाठी हा शहराचा महत्त्वाचा प्रवेशमार्ग आहे. मात्र, पाहणीदरम्यान रस्त्याच्या रुंदीपेक्षा उपलब्ध रस्ता किती मोकळा ठेवला जातो, हा प्रश्न अधिक गंभीर असल्याचे दिसून आले. विशेषतः बोपोडी मेट्रोस्थानक ते खडकी मेट्रोस्थानक हा पट्टा त्याचे ठळक उदाहरण ठरत आहे.

सर्व्हिस रोड नव्‍हे ‘पार्किंग रोड’!

बोपोडी मेट्रोस्थानकापासून खडकी मेट्रोस्थानकापर्यंत मुख्य मार्गालगत सर्व्हिस रोड आहे. स्थानिक वाहतुकीने या रस्त्याचा वापर केल्यास मुख्य मार्गावरील वाहनांचा भार कमी होण्यास मदत होऊ शकते. प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी सर्व्हिस रोडवर वाहने पार्क केलेली दिसतात. . परिणामी, स्थानिक वाहनांनाही मुख्य रस्त्यावर यावे लागते. त्यामुळे स्वतंत्र सर्व्हिस रोड उपलब्ध असूनही मुख्य मार्गावरील वाहनभार कमी करण्याचा त्यामागील उद्देश पूर्ण होताना दिसत नाही.

Bopodi Khadki Traffic
Shirur Onion Cultivation: पाणीटंचाईच्या धास्तीने कांदा लागवडीची लगबग; विकतच्या रोपांना शेतकऱ्यांची पसंती

पदपथावरही वाहनांची घुसखोरी

वाहनांचा मुक्काम केवळ सर्व्हिस रोडपुरता मर्यादित राहिलेला नाही. या पट्ट्यातील काही पदपथांवर चारचाकी तसेच रिक्षा पार्क केल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांना काही ठिकाणी रस्त्यावरून चालावे लागते. त्यातून पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तर निर्माण होतोच; शिवाय वाहनांना वेग कमी करावा लागतो.

मेट्रोसमोर मुख्य रस्त्यावरच प्रतीक्षा

बोपोडी आणि खडकी मेट्रोस्थानकांमुळे या परिसरातील सार्वजनिक वाहतुकीची सुविधा वाढली आहे. मात्र, त्याबरोबर ‘पिकअप-ड्रॉप’चे नियोजन महत्त्वाचे ठरत आहे. मेट्रोने येणाऱ्या प्रवाशांना घेण्यासाठी आलेली खासगी वाहने व रिक्षा सर्व्हिस रोडऐवजी मुख्य मार्गावरच थांबतात. त्यामुळे मागूून येणाऱ्या वाहनांना लेन बदलावी लागते. विशेषतः पिक अवर्समध्ये काही सेकंदांसाठी थांबलेले वाहनही मागे वाहनांची रांग निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकते.

सायंकाळी वाढते अडथळ्यांची गर्दी

दिवसभराच्या तुलनेत सायंकाळी या मार्गावरील वाहनांची संख्या वाढते. कार्यालये सुटण्याची वेळ आणि पुणे, पिंपरी-चिंचवडदरम्यान होणारी ये-जा यामुळे वाहनांचा ओघ वाढलेला असतानाच काही ठिकाणी फळे आणि फळभाज्यांची विक्री करणारी वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. विक्रेत्यांच्या वाहनांसमोर खरेदीसाठी नागरिकांची वाहने थांबतात. त्यातून काही ठिकाणी दुहेरी पार्किंगसदृश परिस्थिती निर्माण होते.

Bopodi Khadki Traffic
Bhongawali Substation Project: भोंगवली वीज प्रकल्प होणारच; पोलिसांकडून आंदोलकांना दम

खडकीनंतर मात्र चित्र बदलते

बोपोडी ते खडकी मेट्रोस्थानकादरम्यान पार्किंग आणि सर्व्हिस रोडच्या वापराचा प्रश्न प्रकर्षाने जाणवत असला, तरी खडकीपासून अंडी उबवणी केंद्राच्या दिशेने पुढे आल्यानंतर तुलनेने दिलासादायक परिस्थिती दिसते. रस्ता मोकळा असल्याने वाहने सुरळीत पुढे सरकतात. प्रशस्त रस्ता मोकळा ठेवल्याचा फायदा वाहतुकीला कसा होतो, हे खडकीनंतरचा पट्टा दाखवून देतो. मात्र, शिवाजीनगरच्या दिशेने पुढे आल्यानंतर परिस्थिती पुन्हा बदलते. शिवाजीनगर एसटी बसस्थानक परिसरात रस्त्याकडेला थांबणाऱ्या वाहनांमुळे वाहनांचा वेग पुन्हा कमी होतो.

... या ठिकाणी हवे लक्ष

  • बोपोडी मेट्रो - पिकअप-ड्रॉपचे नियोजन

  • बोपोडी-खडकी - सर्व्हिस रोडवरील पार्किंग

  • खडकी मेट्रो - मुख्य रस्त्यावर थांबणारी वाहने

  • खडकी- अंडी उबवणी केंद्र - तुलनेने सुरळीत वाहतूक

  • शिवाजीनगर एसटी स्थानक - पुन्हा मंदावणारा वाहनांचा वेग

पदपथ पादचाऱ्यांसाठी आहेत; पण अनेक ठिकाणी त्यावरच वाहने उभी असतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांना रस्त्यावरून चालावे लागते. एवढा प्रशस्त रस्ता करूनही पादचाऱ्यांना सुरक्षित जागा मिळत नसेल तर उपयोग काय? पदपथावरील पार्किंगवर नियमित कारवाई झाली पाहिजे.

रुक्मिणी क्षीरसागर, रहिवासी, खडकी

Bopodi Khadki Traffic
Indapur Voter List Objections: इंदापूरला मतदार यादीतील बोगसगिरी उघड; मोठा गोंधळ

बोपोडी आणि खडकी मेट्रोस्थानकाजवळ प्रवासी घेण्यासाठी रिक्षांना व्यवस्थित जागा निश्चित केलेली असावी. प्रवासी बाहेर आल्यावर रिक्षा किंवा कार मुख्य रस्त्यावर थांबली की मागची वाहतूक लगेच अडते. स्वतंत्र पिकअप- ड्रॉप झोन केल्यास प्रवाशांचीही सोय होईल आणि वाहतुकीला अडथळाही येणार नाही.

सतीश हराळे, रिक्षाचालक

बससारख्या मोठ्या वाहनाला अचानक लेन बदलणे सोपे नसते. मुख्य रस्त्यावर कार, रिक्षा किंवा इतर वाहने थांबलेली असली की बसला वेग कमी करून दुसऱ्या लेनमध्ये जावे लागते. त्याचा परिणाम मागच्या संपूर्ण वाहतुकीवर होतो.

बलभीम शेंडे, बसचालक

रस्तारुंदीकरण झाल्यामुळे या परिसराची वाहतूक आणि व्यावसायिक कनेक्टिव्हिटी सुधारली आहे. मात्र, पार्किंगचे योग्य नियोजन नसल्याने ग्राहकांची वाहने कुठे उभी करायची, हा प्रश्न आहे. केवळ कारवाई करण्याऐवजी नियोजित पार्किंगची जागा निश्चित करून सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी मोकळा ठेवला पाहिजे.

सुरेश राठोड, व्यावसायिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.