

पुणे : पुणे ग्रँड चॅलेंज सायकल स्पर्धेसाठी तयार करण्यात येणारे रस्ते स्पर्धा झाल्यावर ड्रेनेज, पाइपलाइन केबलसह इतर कामांसाठी खोदले जाऊ नयेत व त्यांचा दोषदायित्व कालावधी संपुष्टात येऊ नये, यासाठी महापालिकेच्या पथ विभागाने आत्तापासूनच खबरदारी घेतली आहे.(Latest Pune News)
सोमवारी सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेत या रस्त्यांवर ड्रेनेज, पाइपलाइन, भूमिगत केबल टाकण्याची कामे रस्ते तयार करण्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून, रस्ता पूर्ण झाल्यावर जर ते खोदण्यात आले, तर अशा विभागाला 10 पट दंड ठोठावून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.
राष्ट्रीय पातळीवरील पुणे ग्रँड चॅलेंज ही सायकल स्पर्धा पुढील वर्षी जानेवारी 2026 मध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यात आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचा मार्ग पुणे शहरातून 55 किमी, तर पुणे कॅन्टोन्मेंट आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच, अशा एकूण 75 किमी मार्गाचे नूतनीकरण केले जाणार आहे. त्यासाठी महापालिका सुमारे 145 कोटी रुपये खर्च करणार आहे. ही कामे चार टप्प्यांत विभागली आहेत. या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीसाठी आयुक्त नवल किशोर राम यांनी सोमवारी महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. या बैठकीत वरील आदेश देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त दिवटे यांनी दिली.
या बैठकीला पथ विभाग, पाणीपुरवठा, ड्रेनेज, एमएसईबीसीएल, ट्रॅफिक पोलिस तसेच ओएफसी केबल टाकणाऱ्या दोन कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आयुक्तांनी बैठकीत विभागीय समन्वयावर विशेष भर देत सर्व कामे नियोजनपूर्वक आणि वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले. सायकल मार्ग आकर्षक आणि सुरक्षित बनविण्यासाठी फीडर पिलर व स्ट्रीट लाइट्सचे पेंटिंग तसेच बॅनर, पोस्टर, कचरा, राडारोडा आणि बांधकाम साहित्य तातडीने हटविण्याचे निर्देश देण्यात आले.
तसेच, रस्त्याच्या डिव्हायडरला काळा-पिवळा रंग देऊन सौंदर्यीकरण तसेच गवत व झुडपे साफ करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आयुक्तांनी पदपथ दुरुस्तीसाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा निधी उपलब्ध करून देण्याचे आदेशही दिले. फुटपाथवर बसविण्यात येणाऱ्या पेवर ब्लॉकचे मानकीकरण करण्यासाठी काळा आणि पिवळा रंग निवडण्यात आला असून, त्याचा नमुना प्रयोग करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही आदेश आयुक्तांनी दिले. आयुक्तांनी गणेशखिंड रस्ता आणि म्हात्रे पूल परिसरात खड्डे बुजवण्याच्या प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना कार्यक्षमतेसाठी सूचना दिल्या.
रस्ते खोदल्यामुळे 100 किमी रस्त्याचा दोषदायित्व कालावधी संपला
पुणे महापालिकेच्या पथ विभागाने 2023 मध्ये सुमारे 300 कोटी रुपये खर्च करून पाच पॅकेजमध्ये सुमारे 100 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार केले होते. या रस्त्यासाठी पाच वर्षे दोषदायित्व (डिफेक्ट लायबिलिटी पीरिअड-डीएलपी) कालावधी होता. पण, या रस्त्यावर पालिकेच्या पाणीपुरवठा, ड्रेनेजसह अन्य विभागांसह केंद्र आणि राज्य सरकारचे विभाग, खासगी केबल कंपन्यांनी विविध कामांसाठी रस्त्याची खोदाई केली आहे.
पालिकेच्या पथ विभागाने खोदाईला परवानगी दिल्यामुळे या रस्त्याचा दोष दायित्व कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे हे रस्ते दुरुस्त करण्याच्या जबाबदारीतून संबंधित ठेकेदार मुक्त झाले असून, पालिकेवर हा खर्चाचा भार पडत आहे. परिणामी, सायकल स्पर्धेसाठी बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांची ही व्यवस्था होऊ नये, यासाठी आयुक्तांनी आधीच कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.