

पुणे : कोथरूड गोळीबार प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आलेला गुंड नीलेश घायवळ याच्या घरातून पोलिसांनी दोन काडतुसे, तसेच चार पुंगळ्या जप्त केल्या आहेत. तर धाराशिव, पुणे, मुळशी, जामखेड येथील जमिनीच्या संदर्भातील खरेदीखत, साठेखतासह इतर कागदपत्रेदेखील मिळून आली आहेत. घायवळ सध्या विदेशात फरार आहे.
पिस्तुलाचा कोणताही वैध परवाना नसताना देखील घायवळ याने बेकायदा काडतुसे घरात बाळगल्याचे समोर आले आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र आळेकर यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, घायवळ याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम 1951 चे कलम 5, 7, 25 (1), 27 (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घायवळ याच्यावर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर कोथरूड पोलिसांनी त्याच्या शास्त्रीनगर कोथरूड येथील श्री संत ज्ञानेश्वर कॉलनीतील घरी शनिवारी (दि. 4) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झडती घेतली. त्यावेळी त्याच्या घरातील कपाटातून दोन काडतुसे आणि चार पुंगळ्या जप्त करण्यात आल्या. पोलिसांना त्याच्या घरात धाराशिव, जामखेड, पुणे आणि मुळशी येथील जमिनीच्या संदर्भातील कागदपत्रे मिळून आली आहेत. त्यामध्ये खरेदीखत आणि साठेखतांचा समावेश असल्याचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.
कदम म्हणाले, त्याच्या घरात दहा तोळे सोन्याचे दागिने मिळून आले आहेत. त्याच्या कार्यालयाची देखील पोलिसांनी झडती घेतली असून, काही कागदपत्रे हाती लागली आहेत. मालमत्तेच्या संदर्भातील सर्व कागदपत्रे पोलिसांकडून तपासली जात आहेत. या वेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा घायवळच्या घराच्या परिसरात तैनात केला होता. सहायक पोलिस आयुक्त भाऊसाहेब पठारे, कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस उपनिरीक्षक नेमाणे तपास करत आहेत.
घायवळ टोळीतील गुंडानी दोन व्यक्तीवर हिंसक हल्ला केल्याप्रकरणी, दोन स्वतंत्र गुन्हे कोथरूड पोलिसात दाखल आहेत. नीलेश घायवळ याच्यासह दहा जणांवर मकोकाअंतर्गत कारवाई केली आहे. पोलिसांकडून घायवळचा शोध घेतला जात असतानाच, तो 11 सप्टेंबरपासून परदेशात असल्याची माहिती समोर आली. घायवळ हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असताना त्याला पासपोर्ट मिळालाच कसा, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला. त्या दृष्टीने तपास केला जात असताना, त्याने अहिल्यानगर येथील पत्त्यावर पासपोर्ट काढल्याचे पुढे आले. तो पासपोर्ट काढताना त्याने गायवळ नावाने प्रक्रिया केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या आधारकार्डसह इतर काही कागदपत्रावर त्याने नीलेश घायवळ न लावता नीलेश गायवळ असे नाव लावल्याचे दिसून आले.
पुणे पोलिसांनी याबाबत अहिल्यानगर पोलिसांकडून नुकतीच माहिती घेतली असून, पासपोर्ट विभागाला ही माहिती देऊन त्याचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. घायवळचे वास्तव्य सध्या स्विझर्लंडमध्ये असल्याची माहिती आहे. घायवळ, तसेच त्याच्या कुटुंबीयांचे आर्थिक स्रोत पोलिसांनी तपासण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार घायवळ, त्याच्या कुटुंबीयांची दहा बँक खाती गोठविण्यात आली असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी सांगितले.