

Maharashtra Politics
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत सोमवारी (दि. ६) जाहीर झाली. पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदांपैकी ४ ठिकाणी आणि ४ नगरपंचायतींपैकी 3 ठिकाणी नगराध्यक्षपदावर महिला विराजमान होणार आहेत. तर, दोन ठिकाणी अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद राखीव राहणार आहे. आठ नगरपरिषदांची नगराध्यक्षपदे सर्वांसाठी खुली आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीपूर्वी घ्याव्यात, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर प्रशासनाने वेगाने तयारी सुरू केली आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मंत्रालयात आरक्षणाची ही सोडत काढण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील दौंड, शिरूर आणि जुन्नर येथील नगरपरिषदांचे नगराध्यक्षपद इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिलांसाठी राखीव राहणार आहे. तर चाकण नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असेल. त्यामुळे या चार नगरपरिषदांमध्ये महिला राज असणार आहे. फुरसुंगी- उरळी देवाची आणि लोणावळा नगरपरिषदांचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाले आहे.
यंदा पुणे जिल्ह्यात मंचर, माळेगाव आणि वडगाव मावळ या नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यापैकी मंचर नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिलांसाठी राखीव राहील, तर वडगाव मावळ नगरपंचायतींची नगराध्यक्षपदे खुल्या प्रर्वगातील महिलेसाठी खुले राहणार आहे. याचबरोबर माळेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव राहणार आहे.
देहू नगरपंचायतीचा कार्यकाळ अजून १४ ते १५ महिने बाकी आहे. जानेवारी २०२७ मध्ये तो संपणार आहे. त्यामुळे यंदा देहू नगरपंचायतीची निवडणूक होणार नाही. मात्र त्यावेळी वेगळी प्रक्रिया राबविण्याऐवजी आताच नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. देहू नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव राहणार आहे.
राजगुरुनगर, जेजुरी, आळंदी, बारामती, तळेगाव-दाभाडे, सासवड, भोर आणि इंदापूर या नगरपरिषदांची नगराध्यक्षपदे सर्वांसाठी खुली राहतील.
राज्य सरकारने सप्टेंबर २०२४ रोजी अधिसूचना जाहीर करून फुरसुंगी आणि उरळी देवाची या दोन गावांना पुणे महापालिकेच्या हद्दीतून वगळून स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याचा निर्णय घेतला. नव्याने स्थापन होणाऱ्या या नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी अनुसूचित जातीप्रवर्ग साठी राखीव ठेवण्यात आला आहे.