

पुणे : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील अपघाताच्या वेळी त्या गाडीत नसल्याचे स्पष्ट झाल्याने तिच्यावर कोणताही गुन्हा दाखल करता येणार नसल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. त्यामुळे अपघात प्रकरणात तिला अखेर दिलासा मिळण्याबरोबरच क्लीन चिट देखील मिळाली आहे. (Latest Pune News)
वडगाव पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातानंतर तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत होती. हा अपघात 30 सप्टेंबर रोजी मध्यरात्री वडगाव पुलाजवळ झाला होता. पाटील यांच्या गाडीने मागून एका रिक्षाला जोरदार धडक दिली होती. या धडकेत रिक्षाचालक मरगळे गंभीर जखमी झाले, तर रिक्षातील दोघे प्रवासीही जखमी झाले. अपघातानंतर सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
काही जणांवर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी पाटीलसह तिच्याबरोबर काम करण्यांवर आरोप केले होते. यामध्ये अपघातानंतर त्यांनी कोणतीही चौकशी केली नाही आणि पोलिसही कारवाई टाळत आहेत, असा आरोप करण्यात आला. या प्रकरणावरून सामाजिक माध्यमांवरही संताप व्यक्त होत होता.
या दबावानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, वाहनचालकाचे स्टेटमेंट आणि सर्व पुरावे तपासले. या तपासात गौतमी पाटील अपघाताच्या वेळी त्या गाडीत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करता येणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले. संबंधित गाडीचा चालकच अपघातासाठी जबाबदार असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा त्याच्यावर दाखल केला आहे.