

पुणे : या परिसरामध्ये 2018 मध्ये आलो होतो त्यानंतर प्रथमच येथे येत आहे. मात्र कात्रज-कोंढवा मार्गाचे काम आगामी काळात लवकरात पूर्ण करण्यात येईल. मेट्रोच्या माध्यमातून कोंढव्याचा भाग इतर भागाशी जोडण्यात येईल. स्वारगेट ते कात्रज मेट्रोमार्ग कोंढव्यापर्यंत आणणे आणि पुरंदर विमानतळाशी जोडणारी प्रस्तावित मेट्रोच्या माध्यमातून या भागाला जोडण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
श्री भैरवनाथ ग्रामविकास मंडळाच्यावतीने कोंढवा बु. येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, चेतन तुपे, माजी नगरसेविका रंजना टिळेकर, सुनील कामठे, वृषाली कामठे, तुषार कदम, मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज एक दृष्टे नेते, राज्यकर्ते होते त्यांनी समतेचे राज्य निर्माण केले. स्त्रियांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांना कठोरातले कठोर शिक्षा करणारे त्यांचे शासन होते. ज्या काळात मोगलशाही, निजामशाही, आदिलशाही असे परकीय आक्रमक मराठीभूमीवर आक्रमण करीत होते, त्यावेळी अनेक राजे आणि राजवाडे मुघलांचे मंडलिक म्हणून आधिपत्य स्वीकारत होते. अशा काळामध्ये जिजाऊ मासाहेबांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली. अठरापगड जातीच्या नागरिकांना एकत्र करून, त्यांच्यामाध्यमातून हिंदवी स्वराज्य स्थापन केले.
छत्रपती संभाजी महाराजांनी ही मुघलांशी लढाई करुन स्वराज्याचे रक्षण केले. त्यानंतर ताराराणींनी झुंज कायम ठेवत मराठ्यांनी दिल्लीचे तख्तही काबीज केले. अटकेपार झेंडाही मराठ्यांनीच लावला. आम्हाला स्वाभिमान देणारे, महाराष्ट्राचा अभिमान असणारे शिवाजी महाराजांचा सिबीएससीच्या अभ्यासक्रमात २१ पानांचा जाज्वल इतिहासाचा समावेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविकात बोलताना टिळेकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पण झाले. राज्य शासनाच्या माध्यमातून कोंढवा परिसराचा पायाभूत विकास करण्यात येत आहे.