

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) आणि भारतीय जनता पक्ष समोरासमोर लढतील; मात्र ही लढत मैत्रीपूर्ण स्वरूपाची असेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. उद्घाटन कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
फडणवीस म्हणाले, १५ जानेवारी रोजी महापालिका निवडणूक होत असल्याचा आम्हाला आनंद आहे. दीर्घकाळ प्रशासकांच्या माध्यमातून महापालिका चालवली जात होती; मात्र ही पद्धत लोकशाहीला साजेशी नव्हती. त्यामुळे आता जनतेला पुन्हा आपला कौल देण्याची संधी मिळणार आहे. पुणेकर जनता पुन्हा एकदा आम्हाला कौल देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महायुतीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात जास्तीतजास्त ठिकाणी महायुती निवडणूक लढवणार आहे. काही ठिकाणी महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढती होतील, हेही त्यांनी स्पष्ट केले. पुण्यात शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत भाजपची युती राहील, असेही त्यांनी सांगितले.
मतदार याद्यांबाबत सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, काही ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे खरे आहे; मात्र त्यामुळे निवडणुका घेऊ नयेत, हा कोणताही पर्याय नाही. विरोधक विविध कारणे काढून निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत असतील; मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे की निवडणुका वेळेतच झाल्या पाहिजेत.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.