

पुणे : शहरातील मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये येणाऱ्या नागरिकांना त्यांची वाहने सुरक्षित पार्क करता यावी, यासाठी महानगरपालिकेने विविध ठिकाणी तब्बल 31 वाहनतळ उभारले आहेत. हे वाहनतळ खासगी ठेकेदारांना चालविण्यासाठी देण्यात आले आहेत. ठेका घेताना सर्व नियमांचे पालन केले जाईल, असे प्रतिज्ञापत्र ठेकेदाराकडून घेतले जाते. मात्र, प्रत्यक्षात वाहनतळांवर ठेकेदार आणि त्यांचे कामगार गुंडगिरी करत नागरिकांकडून वाढीव रक्कम घेत असल्याचे उघड झाले आहे. याबाबत ‘पुढारी’ने वृत्त दिले होते. याची दखल घेत अखेर मनपा आयुक्त नवल किशोर राम हे शहरातील वाहनतळांचा आढावा घेणार आहेत.(Latest Pune News)
पुण्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. शहरात मध्यवस्तीत प्रमुख बाजारपेठ असून खरेदीसाठी नागरिक या ठिकाणी येत असतात. त्यांना वाहने लावण्यासाठी अडचण होऊ नये यासाठी महापालिकामार्फत 31 वाहनतळ उभारण्यात आले आहेत. हे वाहनतळ महापालिकेने ठेकेदारांना चालविण्यास दिले आहेत. दुचाकी व चारचाकी वाहने लावण्यासाठी किती दर घ्यावे
हे देखील पालिकेने ठरवून दिले आहेत. मात्र, ठेकेदार मनमानी पद्धतीने जादा दर वसूल करत आहेत. तसेच याबाबत जाब विचारल्यास त्यांना उर्मट उत्तरे देखील दिली जातात. याबाबत ‘पुढारी’ने काही दिवसांपूर्वी पाहणी केली होती. त्यात अनेक गैरप्रकार समोर आले. शिवाजीराव आढाव पार्किंगमध्ये आलेल्या एका नागरिकाने ‘हे पार्किंग महापालिकेचे आहे ना?’ असे विचारल्यावर त्यावर कर्मचाऱ्याने उर्मट उत्तर देत ‘हे पार्किंग माझं आहे, महापालिका विसरा...’ असे उत्तर दिले.
तर दुसरा कर्मचाऱ्याने ओरडत ‘गाडी हँडल लॉक केल्यास लॉक तोडण्याची धमकी दिली. शुल्क वसूल करणारा म्हणाला, ‘पावती आणि पैसे दोन्ही घेऊन गुपचुप निघायचं..’ ही दादागिरी आणि अरेरावीची भाषा नागरिक शहरातील विविध वाहनतळात रोज अनुभवत आहेत. या प्रकाराबाबत आयुक्त नवल किशोर राम यांना विचारले असता, होणारा हा प्रकार गंभीर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या प्रकरणी शहरातील सर्व वाहनतळांचा आढावा घेऊन कारवाई करणार असल्याची माहिती आयुक्त राम यांनी दिली.
निश्चित शुल्कापेक्षा जास्त वसुली
महापालिकेने शहरातील वाहनतळांची गर्दीनुसार अ, ब आणि क अशा झोनमध्ये वर्गवारी केली आहे.
क झोन : मुख्य बाजारपेठ व गजबजलेल्या भागात
ब झोन : स्टेशन, बसस्थानक यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी
अ झोन : उपनगरातील पार्किंग
या झोननुसार पार्किंग शुल्क ठरविण्यात आले आहे. मात्र ठेकेदार निश्चित दरापेक्षा अधिक शुल्क आकारून नागरिकांची लूट करत असून त्यांच्याशी अरेरावीची भाषा वापरून दहशत निर्माण केली जाते.
महापालिकेचे अधिकृत पार्किंग शुल्क
अ झोन : दुचाकी 1 रु. प्रतितास, चारचाकी 7 रु. प्रतितास
ब झोन : दुचाकी 2 रु. प्रतितास, चारचाकी 10 रु. प्रतितास
क झोन : दुचाकी 3 रु. प्रतितास, चारचाकी 14 रु. प्रतितास
शहरातील पार्किंगसंदर्भात वारंवार तक्रारी येत आहेत. संबंधित ठेकेदारांना यापूर्वीही नोटीस दिली आहे. पुन्हा एकदा चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल.
दिनकर गोजारे, मुख्य अभियंता, प्रकल्प विभाग, महापालिका