

पुणे : जिल्हा परिषद आणि 13 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गट व गणनिहाय प्रारूप मतदार याद्या बुधवारी (दि. 8) प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. अंतिम यादी 27 ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अहर्ता दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशीपर्यंत विधानसभेच्या मतदारयादीत नाव असणाऱ्यांनाच या निवडणूकीसाठी मतदान करता येणार आहे.(Latest Pune News)
गण- गटाच्या मतदारयाद्यांवरील हरकती व सूचना 14 ऑक्टोबरपर्यंत स्वीकारल्या जातील. त्यावरील सुनावणी 26 ऑक्टोबरपर्यंत घेण्यात येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी गट व गणनिहाय अंतिम मतदारयाद्या प्रकाशित होतील. तसेच, याच दिवशी मतदान केंद्राची आणि मतदान केंद्रानिहाय मतदारयादीही जाहीर केली जाणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आली.
जिल्ह्यातील 14 नगरपरिषदा व 3 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी बुधवारी (दि. 8) प्रसिद्ध होईल. त्यावर 13 ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 28 ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाईल. नगर पंचयात आणि नगर परिषदेच्या मतदान केंद्रांची यादी 7 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील नगरविकास विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी दिली.
गण-गट आणि प्रभागनिहाय मतदारयाद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश, नावे वगळणे किंवा नावे-पत्त्यांमध्ये दुरुस्ती करण्याची कार्यवाही राज्य निवडणूक आयोग करत नाही. मतदारयाद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून झालेल्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे किंवा विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे अशा संदर्भातील दुरुस्त्यांबाबत मतदार हरकती व सूचना दाखल करू शकतात.
नाव दुसऱ्या गट / गणात; तहसीलदारांकडे दाखल करा हरकत
मतदार एका गटात- गणात राहात असून, नाव दुसऱ्या ठिकाणच्या मतदार यादीत आले असेल, तर प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 14 ऑक्टोबरपर्यंत संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांकडे हरकत व सूचना दाखल करता येतील. तसेच नगरपंचायत व नगरपरिषदेच्या प्रभागनिहाय मतदारयाद्यांबाबत हरकती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करता येणार आहेत. त्यावर सुनावणी घेतली जाणार आहे.