

पुणे : बालाजीनगर येथील एका किराणा दुकानदाराने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर नातेवाईकांनी राजस्थानमधील गावी जाऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कारानंतर त्यांना गावातील दोघा भावाबहिणींनी प्रेमाचे नाटक करून त्यांच्यासोबत काढलेले फोटो व व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊन लाखो रुपये उकळल्याचे उघडकीस आले. बाबुराम मगाराम चौधरी (वय 43, रा. बालाजी ट्रेडर्स, केके मार्केट, बालाजीनगर) असे आत्महत्या केलेल्या दुकानदाराचे नाव आहे.
दरम्यान, या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बाबुराम याचा भाऊ हरीशचंद्र मगाराम चौधरी (वय 42, रा. भाभ्भुओं की ढाणी, बैठवासिया, ता. ओसिया, जि. जोधपूर, राजस्थान) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी तुलसी ऊर्फ चुकी भुराराम जान्दु (वय 26), मुकेश भुराराम जांन्दु (वय 24, दोघे रा. चैनाणियों की ढाणी, भटियाणी जी का थान रायमलवाडा, ता. बापिणी, जि. फलोदी, राजस्थान) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एक ते दोन वर्षांपासून 21 जुलै 2025 दरम्यान सुरू होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबुराम चौधरी यांचे बालाजीनगरमध्ये बालाजी ट्रेडर्स या नावाने किराणा दुकान होते. त्यांना तुलसी व मुकेश यांनी प्रेमाचे खोटे नाटक करून त्यांच्यासोबत फोटो काढले. हे फोटो व व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली. त्यानंतर या दोघांनी राजस्थानमधील आपल्या गावाकडील सोनाराकडून सोन्याचे दागिने खरेदी केले.
त्याचे पैसे बाबुराम चौधरी यांना देण्यास भाग पाडले. अशा प्रकारे त्यांनी सोन्याचे दागिने, मोबाईल खरेदी केले. त्याचे बिल बाबुराव चौधरी यांना देण्यास लावले. त्यांच्याकडून रोख रक्कम व मनी ट्रान्सफरद्वारे बळजबरीने पैसे उकळले. या मानसिक व आर्थिक त्रासाला कंटाळून त्यांनी 21 जुलै 2025 रोजी बालाजीनगर येथे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यांचे नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी गावी गेले. अंत्यसंस्कारानंतर गावातील लोक त्यांना भेटायला आल्यानंतर फिर्यादी यांना बाबुराम चौधरी यांच्या आत्महत्येमागील कारण समजले. त्यांनी गावातील सोनार व इतरांकडे चौकशी केल्यावर त्यांची खात्री झाली. त्यानंतर आता 45 दिवसांनी ते पुण्यात आले आणि त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहकारगनर पोलिस करीत आहेत.