

ओतूर : ओतूर (ता. जुन्नर) गावठाण हद्दीतील देवगल्ली व ५२ गल्लीत कुत्र्यांची नागरिकांसमोर बिबट्याने शिकार करून धुमाकूळ घातला आहे. या दहशत माजवणाऱ्या बिबट्यास जेरबंद करण्यास अखेर वनविभागाला यश आले आहे.
ओतूर येथील बारदारी रस्ता तसेच चैतन्य विद्यालय, श्री गाडगे महाराज विद्यालय, देवगल्ली, श्री क्षेत्र कपार्दिकेश्वर मार्ग, ५२ गल्ली या परिसरामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. येथील पांडू नामे कुत्र्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने चैतन्य विद्यालयाच्या बाजूला पिंजरा लावला होता. त्यात बुधवारी (दि. १) रात्री बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती ओतूरचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली.
ओतूर येथील बारदारी रस्त्यावर विद्यार्थी, नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. याची वनविभागाने याबाबत दखल घेऊन विविध ठिकाणी चार पिंजरे लावले होते. येथील चैतन्य विद्यालयाच्या बाजूला लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी रात्री अंदाजे सात वर्षांचा नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला. ही बाब रात्रगस्त करणाऱ्या वनविभागाचे पथकास दिसून आली. हा बिबट्या वनविभागाने ताब्यात घेऊन माणिकडोह निवारा केंद्रात दाखल केला आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सारिका बुट्टे, वनरक्षक विश्वनाथ बेले, वनरक्षक किसन खरवडे, वनमजूर गणपत केदार, किशन केदार, फुलचंद खंडागळे, सागर विरनक, साहेबराव पारधी, आळे येथील रेस्क्यू टीमने बिबट्याला रेस्क्यू केले. दरम्यान, या भागात आणखी दोन बिबटे असल्याचे बोलले जाते. एक बिबट्या जेरबंद झाला असताना दुसऱ्याने नागिकांना दर्शन दिले आहे. त्यामुळे बिबट्यांची दहशत ओतूर गावठाणात कायम आहे. रात्री-अपरात्री काम करताना काळजी घ्यावी. घराबाहेर पडताना बॅटरी किंवा काठी ठेवावी, रात्रीला बिबट प्रवण क्षेत्रातून वाहने सावकाश चालवावी, किंवा गाडीचे हॉर्न मोठ्याने वाजवावे, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.