

पुणे: एकाच ठिकाणी देशातील बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन... आकर्षक महादेव रथ... गाण्यांच्या तालावर नाचणारी विद्युतरोषणाई... फुलांची मनमोहक सजावट, तर दुसरीकडे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विकासकामांचा आढावा मांडणारे प्रदर्शन... अशा वैविध्यपूर्ण देखाव्यांनी नाना पेठेतील गणेशोत्सव यंदा लक्षवेधी ठरत आहे. धार्मिक आणि प्रबोधनात्मक देखाव्यांबरोबरच काही मंडळांनी आकर्षक सजावटीवर भर दिला असून, अनेक मंडळांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यास प्राधान्य दिले आहे.
देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
वीर महाराणा मित्रमंडळाने 'बारा ज्योतिर्लिंग' हा धार्मिक देखावा साकारला आहे. देशभरातील बारा ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती एकाच ठिकाणी उभारण्यात आल्याने भाविकांना त्यांच्या दर्शनाची अनुभूती मिळत आहे. मंडळाची आकर्षक गणेशमूर्तीही भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे गणरायाच्या दर्शनासोबतच बारा ज्योतिर्लिंगांचा देखावा पाहण्यासाठी भाविकांची पावले मंडळाकडे वळत आहेत. साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराने 'विकासाचे अजितपर्व' हा देखावा साकारला आहे.
यामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीतून पुणे जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या लहान प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. तसेच, देखाव्यातील अजितदादांचा पुतळाही लक्ष्य वेधून घेतो. याखेरीज, अन्य माहिती देणारे फ्लेक्सरूपी छायाचित्र प्रदर्शन मांडण्यात आले आहे. विविध विकासकामांची छायाचित्रे आणि त्यासंदर्भातील माहिती नागरिकांना या प्रदर्शनातून पाहता येत आहे.
नाना पेठेतील खिलाडी मित्रमंडळाने आकर्षक फुलांची सजावट करून गणरायाचा दरबार सजविला आहे. श्री शिवराज मंडळ ट्रस्टने गाण्यांच्या तालावर नाचणारी विद्युतरोषणाई साकारली असून, रंगबिरंगी दिव्यांचा झगमगाट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. देशप्रेमी मित्रमंडळाने साकारलेला आकर्षक 'महादेव रथ'ही गणेशभक्तांसाठी आकर्षण ठरत आहे. अशोक चौक मित्रमंडळ, नवा वाडा सार्वजनिक उत्सव मंडळ ट्रस्ट आणि भवानी तलवार तरुण मंडळाने आकर्षक सजावटीवर भर दिला आहे. विविध प्रकारची सजावट आणि रोषणाईमुळे रात्री मंडळांचा परिसर उजळून निघत आहे.
दरम्यान, भव्य देखाव्यांच्या स्पर्धेत न उतरता नाना पेठेतील अनेक मंडळांनी यंदा साधेपणाला पसंती दिली आहे. अरुणा चौक तरुण मंडळ, अखिल नाना पेठ समझोता मित्रमंडळ, नाना पेठ गवळी मंडळ, नाना पेठ तरुण मंडळ, समाधान मित्रमंडळ, भारत मित्रमंडळ डोके तालीम संघ, श्री बालमित्र तरुण मंडळ, शिवतेज मित्रमंडळ, नेहरू तरुण मंडळ, जय बजरंग कबड्डी संघ ट्रस्ट, प्रगतशील तरुण मंडळ ट्रस्ट, तरुण मंडळ, जय जवान मित्रमंडळआणि नवरंग युवक मित्रमंडळाने साधेपणाने गणरायाची प्रतिष्ठापना करून उत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे.
आवर्जून पाहावेत असे आकर्षक देखावे
बारा ज्योतिर्लिंग - वीर महाराणा मित्रमंडळ, २८३, नाना पेठ
विकासाचे अजितपर्व - साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर, नाना पेठ
गाण्यांवरील विद्युतरोषणाई - श्री शिवराज मंडळ ट्रस्ट, नाना पेठ
श्री दत्त अवतार - श्री संभाजी मित्रमंडळ, नाना पेठ