

पुणे: फुलांनी सजलेला गालिचा, सनई-नगाऱ्यांच्या प्रतिकृती, श्रीगणशोची विविध रूपे, ठिपक्यांची सुंदर रांगोळी अन् सामाजिक संदेश देणाऱ्या आशयपूर्ण कलाकृती, गणेशोत्सवाच्या उत्साहाला आता रंगावलीकारांच्या कल्पकतेची जोड लाभली आहे आणि रंगावलीकारांनी साकारलेल्या वेगवेगळ्या डिझाइनमधील रांगोळ्या पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. सध्या रंगावलीकारांकडून घरगुती गणपतीसह श्रीगणेश मंडळे आणि सोसायट्यांच्या उत्सवात सुरेख रांगोळ्या काढल्या जात असून, उत्सवात रांगोळी काढण्यासाठी रंगावलीकारांना ठिकठिकाणी बोलावले जात आहे. त्यामुळेच रंगावलीकारांचे वेळापत्रक सध्या व्यग्र आहे. उपलब्ध जागा, सजावटीची संकल्पना आणि आवडीनुसार नवनवीन डिझाइनच्या रांगोळ्या साकारल्या जात आहेत.
गालिचा रांगोळ्यांना सर्वाधिक मागणी
रांगोळीला मांगल्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे विविध संकल्पनांनुसार रांगोळ्या साकारण्यासाठी रंगावलीकारांना ठिकठिकाणी बोलावले जात आहे. मंडळांच्या ठिकाणी गालिचा रांगोळी आणि सामाजिक संदेश देणारी रांगोळी काढली जात आहे. तर, सोसायट्यांमध्ये पोर्ट्रेट आणि गालिचा रांगोळीला मागणी आहे. घरगुती कार्यक्रमांमध्ये फुलांची रांगोळी, श्रीगणेशाची विविध रूपे, ठिपक्यांची रांगोळी, एखाद्या संकल्पनेवर आधारित रांगोळी, मोर, कमळ या डिझाइनमधील रांगोळी, रांगोळीसोबत दिवे, वारली पेंटिंग आणि पोट्रेट रांगोळी काढून घेण्याकडे कल आहे.
विविध रंगसंगती आणि डिझाइनमधील रांगोळ्या आणि पायघड्या लक्षवेधी ठरत असून, रंगावलीकार आणि त्यांचे सहकालाकरही मोठ्या मेहनतीने आणि कल्पकतेने मनोहारी रांगोळीच्या पायघड्या साकारत आहेत. सोशल मीडिया आणि विशेषतः इन्स्टाग्राममुळे रंगावलीकारांना नागरिकांपर्यंत थेट पोहचणे शक्य होत असल्याने कामाच्या संधी वाढल्या आहेत. अनुभवी रंगावलीकारांसह नव्या पिढीतील कलाकारही उत्सवात आपली कला सादर करीत आहेत.
रंगावलीकार सुनील सोनटक्के म्हणाले, “गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा घरगुती कार्यक्रमांसाठी रांगोळी काढण्याची चांगली मागणी आहे. मंडळांकडूनही संधी मिळत आहे. मंडळांसाठी मी सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या साकारल्या आहेत, तर घरगुती गणपतीसाठी वेगवेगळ्या डिझाइन्सच्या रांगोळ्या साकारत आहेत. रंगावलीकार सुरज लेकावळे यांनी, 'गणेशोत्सव आणि विशेषतः गौरीपूजनासाठी यंदा चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या काही दिवसांत अनेक ऑर्डर्स मिळाल्या. इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियामुळे नागरिकांपर्यंत पोहचणे सोपे झाले आहे. आगामी चार-पाच दिवसांच्याही ऑर्डर्स आहेत,' असे सांगितले.
रांगोळीचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. यामध्ये गालिचा रांगोळी, पोर्ट्रेट रांगोळी आणि फुलांची रांगोळी, यांचा समावेश होतो. सध्या कमी खर्चात आणि कमी वेळेत तयार होणाऱ्या डिझाइनच्या, म्हणजेच गालिचा रांगोळ्यांना सर्वाधिक मागणी आहे. घरगुती कार्यक्रमांमध्ये रांगोळी काढण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या फ्लॅटसंस्कृतीमुळे घरांसमोर पूर्वीसारखी मोठी जागा उपलब्ध नसल्याने बॉर्डर रांगोळी, पोट्रेट रांगोळी आणि फुलांच्या रांगोळीची मागणी होते. उपलब्ध जागेनुसार रांगोळी साकारावी लागते.
अमित पवार, रंगावलीकार