

पुणे: पत्नीने जीवनसाथी, मुलांनी वडील, तर वृद्ध आई-वडिलांनी मुलगा रस्ते अपघातात गमावला. घरातील कर्त्या पुरुषाच्या अपघाती मृत्यूच्या दुःखातून सावरत कुटुंबाने नुकसानभरपाईसाठी न्यायालयाचे दार ठोठावले. अखेर दावा दाखल केल्यापासून अवघ्या वर्षभरात कुटुंबाला दिलासा मिळाला असून, १ कोटी १० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या लोकअदालतीत घेण्यात आला.
मोटार अपघात न्यायाधिकरणाचे प्रमुख सदस्य तथा जिल्हा न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांच्या पॅनेलसमोर तडजोडीअंती हा दावा निकाली निघाला. तडजोडीच्या रकमेचा धनादेश प्रमुख जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे आणि विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
माधव (वय ३२, नाव बदलले आहे) हे ३० जुलै २०२५ रोजी दुचाकीने साताऱ्याहून पुण्याकडे येत होते. त्या वेळी डिव्हायडर तोडून समोरून आलेल्या आयशरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात माधव यांचा मृत्यू झाला. ते शासकीय सेवेत होते आणि त्यांना दरमहा ७७ हजार २७६ रुपये वेतन मिळत होते.
त्यांच्या मृत्यूनंतर पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई-वडिलांनी सप्टेंबर २०२५ मध्ये दीड कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केला होता. हा दावा तडजोडीसाठी लोकअदालतीसमोर ठेवण्यात आल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये समझोता झाला. लोकअदालतीत तडजोड होऊन १ कोटी १० लाख रुपयांवर दावा निकाली निघाला.
घरातील कर्त्या व्यक्तीची उणीव कोणतीही भरपाई भरून काढू शकत नाही. मात्र, त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाच्या भवितव्यासाठी नुकसानभरपाईचा मोठा आधार असतो. मोटार अपघाताचे दावे अनेकदा दीर्घकाळ प्रलंबित राहतात. अशावेळी अवघ्या वर्षभरात एक कोटीहून अधिक भरपाईवर तडजोड होणे महत्त्वाचे आहे. लोकअदालतीमुळे वेळ आणि खर्च वाचून पीडित कुटुंबाला जलद आर्थिक दिलासा मिळाला ही नक्कीच आशादायी बाब आहे.
ॲड. योगेश जैन, कार्यकारिणी सदस्य, पुणे बार असोसिएशन