

पुणे : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी निवडणूक प्रक्रियेला मंगळवारपासून अधिकृत सुरुवात झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी शहरभर राजकीय हालचालींना वेग आला आहे.
४१ प्रभागांतून १६५ सदस्यांच्या निवडणुकीसाठी १५ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये कार्यान्वित करण्यात आली असून, या कार्यालयांमधून तब्बल २८८६ नामनिर्देशन फॉर्मची विक्री झाली. मात्र, विशेष म्हणजे एकाही उमेदवाराने आज प्रत्यक्ष नामनिर्देशन अर्ज दाखल केलेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 30 डिसेंबर ही अंतिम मुदत असल्याने अनेक पक्षांनी शक्तिप्रदर्शन करत तर काही उमेदवारांनी मुहूर्त साधत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे नियोजन केल्याने पुढील काही दिवसांत अर्ज भरण्यास वेग येणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना, प्रभागनिहाय आरक्षण आणि प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहिता जाहीर झाली आहे. मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशीच नामनिर्देशन अर्जांची विक्रमी विक्री झाली. तब्बल २ हजार ८८६ अर्जांची विक्री झाली.
नामनिर्देशन फॉर्मची सर्वाधिक विक्री कसबा–विश्रामबागवाडा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात झाली. येथे सर्वाधिक ३०० फॉर्मची विक्री झाली. याउलट कोंढवा–येवलेवाडी कार्यालयातून सर्वात कमी ५१ फॉर्मची विक्री झाली.
पुणे महापालिकेच्या येरवडा-कळस-धानोरी, नगर रोड-वडगाव शेरी, कोथरूड-बावधन, औंध-बाणेर, शिवाजीनगर-घोले रोड, ढोले-पाटील रोड, हडपसर-मुंढवा, वानवडी-रामटेकडी, बिबवेवाडी, भवानी पेठ, कसबा-विश्रामबाग वाडा, वारजे-कर्वेनगर, सिंहगड रोड, धनकवडी-सहकारनगर तसेच कोंढवा-येवलेवाडी या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उमेदवारांसाठी नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जात आहेत.
पुढील काही दिवसांत नामनिर्देशन अर्जांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण आणि कायदेशीर चौकटीत पार पडावी यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये एफएसटी (फ्लाइंग स्क्वॉड टीम), एसएसटी (स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम), व्हीएसटी तसेच व्हीव्हीटी यांचा समावेश आहे. आतापर्यंत कोणतीही मोठी विद्रूपीकरणाची अथवा गुन्हेगारी स्वरूपाची घटना नोंदवली गेली नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नामनिर्देशन प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना आवश्यक असलेले ना-हरकत दाखले (एनओसी) मोठ्या प्रमाणावर देण्यात आले आहेत. सभा व प्रचार कार्यक्रमांसाठी मंजुरी देण्याची प्रक्रियादेखील नियमितपणे सुरू आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उमेदवार व राजकीय पक्षांकडून सहकार्य मिळत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
क्षेत्रीय कार्यालय-निवडणूक निर्णय अधिकारी-फॉर्म विक्री -येरवडा-कळस-धानोरी : सचिन बारवकर- १९५
- नगर रोड-वडगाव शेरी : भूषण जोशी- १९५
- कोथरूड-बावधन : सचिन पाटील- १९४
- औंध-बाणेर : प्रवीण साळुंखे- ७३
- शिवाजीनगर-घोले रोड : हेमंत निकम- २७५
- ढोले-पाटील रोड : श्रीकांत खरात- १७५
- हडपसर-मुंढवा : गणेश मरकड- १९९
- वानवडी-रामटेकडी : रामहरी भोसले- १९९
- बिबवेवाडी : सिद्धार्थ वसंत भंडारे- २२१
- भवानी पेठ : कल्याण पांढरे- १९१
- कसबा-विश्रामबाग वाडा : नीलेश काळे- ३००
- वारजे-कर्वेनगर : अर्चना यादव- २२१
- सिंहगड रोड : मनोजकुमार किशोर खैरनार- १९७
- धनकवडी- सहकारनगर : सुप्रिया करमरकर- २००
- कोंढवा-येवलेवाडी : मनोहर गव्हाड- ५१
- एकूण दिलेली नामनिर्देशन पत्रे : २८८६
- पक्षनिहाय नामनिर्देशन पत्रे : १२१
- नोंदवलेले गुन्हे : शून्य
- विद्रूपीकरण प्रकरणे : शून्य
- ना-हरकत दाखल्यांसाठी आलेले अर्ज : २४,६५६
- ना-हरकत दाखला देण्यासाठी तयार असलेले अर्ज : ११२६
महानगरपालिका निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले असले तरी पहिल्या दिवशी सर्वच पक्षांनी 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर असल्याने येत्या काही दिवसांत अर्ज दाखल करण्याला वेग येण्याची शक्यता आहे. काही राजकीय पक्ष एकाच वेळी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत, तर काही पक्षांनी मुहूर्त पाहूनच अर्ज भरण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत अद्याप स्पष्टता नसून बैठकांचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पुण्याच्या राजकारणात घडामोडी वेग घेण्याची चिन्हे दिसत आहेत.
नामनिर्देशन अर्ज घेण्यासाठी निवडणूक कार्यालयांमध्ये झालेली गर्दी. -- (फोटो ठेवल फोल्डर मधून घेणे)--