

पुणे : मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात दोन एफआयआर दाखल झाल्या आहेत. बावधनमध्ये केवळ मुद्रांक शुल्क बुडवले, याबाबत तक्रार आहे, पुढे काही त्यात निष्पन्न होणार नाही.
हा गुन्हा कसा आहे, याबाबत माहिती पोलिस आयुक्त आणि आर्थिक गुन्हे शाखा पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांना दिली. पोलिस सांगतात टप्प्याटप्याने कारवाई सुरू आहे; परंतु याबाबत पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली पाहिजे; अन्यथा आम्हाला कोर्टात जावे लागेल, असे मत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या अनुषंगाने दमानिया मंगळवारी (दि. 23) पुण्यात आल्या होत्या. त्यांनी सुरुवातीला पिंपरी-चिंचवड येथील बावधन पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर त्या पुणे शहर पोलिस आयुक्तालयात आल्या. त्यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांची भेट घेतल्यावर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
दमानिया म्हणाल्या की, या गुन्ह्यात एक एफआयआर पाहिजे आणि एक तपास अधिकारी हवा, नाहीतर तपासाची दिशा भरकटणार आहे. खारगे समितीसमोर दिग्विजय पाटील आले नाहीत, तर पार्थ पवारांची अपेक्षाच करता येणार नाही. समन्स पोलिसांनी देऊन देखील तीनवेळा दिग्विजय पाटील आले नाहीत. चौथ्या वेळेस ते येऊन गेले. त्या वेळी पोलिसांनी दिग्विजय पाटील यांची गोडीगुलाबीत चौकशी केली. काही दिवसांनंतर लोक ही केस विसरून जातील, अशी अपेक्षा सत्ताधारी यांना वाटत आहे.
परंतु, मी तर लढणार आहे. अमेडिया कंपनीचे लोक मुंढव्यात जागा ताब्यात घेण्यासाठी गेले होते, त्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए हे वारंवार त्यांच्या संपर्कात होते. अजित पवार यांना जागा खरेदी करताना सर्व गोष्टी माहिती होत्या. चौकशीमध्ये काही निष्पन्न होत नाही. अजित पवार यांच्याविरोधात सिंचन घोटाळा पुरावे सर्व दिले होते. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासोबतच शपथविधी केला, ही गोष्ट चुकीची होती. शीतल तेजवानी हिने न्यायालयात अनेक केस दाखल केल्या आहेत, त्यामुळे खरी चौकशी होत नाही, असे देखील दमानिया यांनी सांगितले.