

पुणे : भारताच्या भविष्याचा पाया म्हणून मुलांना सन्मानित करण्यासाठी, केंद्र शासनाच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने दि. २६ डिसेंबर, २०२५ हा दिवस देशभरात वीर बाल दिवस आयोजित करण्याचे ठरविले आहे.
त्यासाठी राज्य आणि जिल्हास्तरावरील कार्यक्रमांच्या मालिकांद्वारे 'वीर बाल दिवस' साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संलग्न महाविद्यालयांमध्ये येत्या शुक्रवारी 'वीर बाल दिवस' साजरा करावा, असे स्पष्ट निर्देश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालक डॉ. सविता कुलकर्णी यांनी संलग्न महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिले आहेत.
डॉ. कुलकर्णी यांनी दिलेल्या निर्देशानुसार, राज्यामध्ये 'वीर बाल दिवस' व्यापक स्वरूपात साजरा करण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, क्रीडा संस्था, बालसंगोपन संस्था, अंगणवाडी केंद्रे, पूर्व-शाळा/बालपण शिक्षण केंद्रे, अपंग मुलांसाठी विशेष शाळा, बालगृह, निरीक्षणगृह, अनाथाश्रम, युवा क्लब, सामुदायिक शिक्षण केंद्र आदी संस्थांना सहभागी करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. दि. २६ डिसेंबरला महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्था, विभागांमध्ये विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करून 'वीर बाल दिवस' साजरा करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, शासनाच्या निर्देशात नमूद केले आहे.
सद्यःस्थितीत महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका-२०२५ च्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगामार्फत आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. आचारसंहितेचा कोणताही भंग होणार नाही तसेच संबंधित कार्यक्रमास कोणत्याही राजकीय पक्षाने लोकप्रतिनिधी अथवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार नाहीत, याची दक्षता घेऊन संबंधित उपक्रम राबविण्याबाबतचे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार कार्यक्रमांचे आयोजन करताना आदर्श आचारसंहितेचा कोणताही भंग होणार नाही, तसेच याबाबत शासनाच्या प्राप्त निर्देशांचे तंतोतंत पालन होईल, याची नोंद घ्यावी, अशा सूचना देखील डॉ. कुलकर्णी यांनी केल्या आहे.