

पुणे : कलाकाराने प्रायोगिकता नेमकी काय आहे, हे जाणून घेतले पाहिजे. प्रायोगिक नाटकात लेखन, अभिनय, नेपथ्य, ध्वनी यामध्ये नावीन्य जपावे लागते. डिजिटल जगात जिवंत अनुभव देण्याचे आव्हान स्वीकारणे हे प्रायोगिकतेचे मोठे लक्षण आहे. प्रायोगिक रंगभूमी व्यावसायिक रंगभूमीला दिशा देते, असे मत नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केले. लागू यांच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.
महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे अधिष्ठाता पुरस्कार आणि डॉ. रवींद्र दामले स्मृति पुरस्कारांचे वितरण मंगळवारी टिळक रस्त्यावरील श्रीराम लागू रंग-अवकाश येथे करण्यात आले. डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे राजेश देशमुख, एस.पी.कुलकर्णी उपस्थित होते.
आसक्त कलामंच या संस्थेचे समन्वयक आणि कलाकार आशिष मेहता यांना अधिष्ठाता पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. रवींद्र दामले स्मृति पुरस्कार कल्याण येथील 'अभिनय, कल्याण' या संस्थेस देण्यात आला. पुरस्कार सोहळ्यानंतर अभिनय, कल्याण निर्मित, चं. प्र. देशपांडे लिखित आणि अभिजीत झुंजारराव दिग्दर्शित 'मन' या दीर्घांकाचा प्रयोग सादर झाला. राजेश देशमुख यांनी प्रास्ताविक केले. सुहास धारणे यांनी सूत्रसंचालन केले.
कलाकृती परिपक्व होण्यासाठी कलाकृतीचा आविष्कार आणि त्याची समज येणे खूप आवश्यक आहे. देशात आणि जगात खूप चांगली नाटके घडत आहेत. नाटक हे माध्यम चिरकालीन करण्याची गरज आहे. क्षितिजावर दिसत असलेल्या प्रश्नांवर नाटक करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत का, असे प्रश्न पडत राहतात. कलाकाराने कामातून सतत नाविन्याचा शोध घ्यायला हवा.
आशिष मेहता
गेल्या 30 वर्षांपासून आमची संस्था नाटक करण्यासाठी राबत आहे. नाटक करताना अनेक परिस्थितींचा सामना करावा लागतो. त्यावर मात करत नाटक जिवंत ठेवायचे हाच आमचा मानस आहे.
अभिजित झुंजारराव