

पुणे: शहरात सुरक्षित आणि संस्थात्मक प्रसूतींचे प्रमाण वाढल्याने मातामृत्यूत लक्षणीय घट झाली आहे. तीन वर्षांपूर्वी वर्षाला 79 इतके मातामृत्यू होत असत; आता हा आकडा 48 वर आला आहे. उच्च जोखीम असलेल्या गर्भवतींवर ठेवलेले सातत्यपूर्ण लक्ष आणि तातडीच्या उपचारव्यवस्थेमुळे ही घट शक्य झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
महापालिकेच्या आढावा बैठकीत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, शहरात वर्षभरात 62 हजार 801 प्रसूतींची नोंद झाली. विशेष म्हणजे सर्व प्रसूती संस्थात्मक पद्धतीने झाल्या असून, घरगुती प्रसुतीचे प्रमाण जवळपास शून्यावर आले आहे. सुरक्षित प्रसूतीसाठी रुग्णालयीन सुविधांचा वाढलेला वापर आणि गर्भवतींना वेळेवर उपचार मिळाल्याने मातामृत्यू दरातही घट झाली आहे.
2023-24 मध्ये एक लाख जन्मामागे 26 इतका असलेला मातामृत्यू दर 2025-26 मध्ये 11 वर आला आहे. महापालिका हद्दीतील एकूण मातामृत्यू दरही 43 वरून 11 पर्यंत घसरल्याने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी ही दिलासादायक बाब मानली जात आहे.
खासगी रुग्णालयांकडे कल
शहराची लोकसंख्या सुमारे 43 लाख असून, दरवर्षी 62 हजारांहून अधिक प्रसूती होतात. त्यापैकी तब्बल 62 टक्के प्रसूती खासगी रुग्णालये आणि मॅटर्निटी होममध्ये झाल्या आहेत, तर 37 टक्के प्रसूती या महापालिका व ससूनसारख्या सरकारी रुग्णालयांमध्ये झाल्या आहेत.
उच्च जोखीम गर्भवतींचे सातत्याने ट्रॅकिंग, रक्तसाठा सुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता, आपत्कालीन प्रसूती सेवा आणि ’मातृसंजीवनी’सारख्या उपक्रमांवर विशेष भर देण्यात आला. गर्भवतींची पहिल्या तिमाहीत नोंदणी आणि वेळेवर तपासणी यामुळेही मातामृत्यू रोखण्यास मदत झाली आहे.
डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका