

पुणे: ‘एनटीए’मार्फत वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) परीक्षेच्या पेपरफुटीचे कनेक्शन आता पुण्यापर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. पुणे पोलिसांनी बिबवेवाडी परिसरातील सुखसागरनगर येथून मनीषा वाघमारे या ब्युटीपार्लर चालवणाऱ्या महिलेला आणि मांजरी परिसरातून इंजिनीअरिंगला करत असलेल्या शेषराव सोळंकी या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. यातील ब्युटीपार्लर महिलेला केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)च्या ताब्यात देण्यात आले आहे, तर विद्यार्थ्याकडे चौकशी सुरू असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
‘सीबीआय’ने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथून मुख्य संशयित धनंजय लोखंडे याला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर लोखंडेच्या संपर्कात असलेल्या बिबवेवाडीतील मनीषा वाघमारे आणि इंजिनीअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली. विद्यार्थी शोधणे, त्यांच्याकडून पैसे गोळा करणे आणि संशयितांपर्यंत पोहोचवणे, अशी भूमिका या दोघांची असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. नीट परीक्षेच्या पेपरफुटीचा तपास ’सीबीआय’कडे सोपविण्यात आला आहे. सीबीआयने तपास हाती घेताच महाराष्ट्रातही वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. तपासादरम्यान धनंजय निवृत्ती लोखंडे (वय 26) हा महत्त्वाचा संशयित असल्याचे समोर आले. गेली चार-पाच वर्षे तो पुण्यातील वाघोली परिसरात राहत होता. मंगळवारी पुणे पोलिसांना वाघोली परिसरात लोखंडे याचे लोकेशन मिळाले होते.
मात्र, पोलिसांची चाहूल लागताच तो तेथून पसार झाला. त्यानंतर मध्यरात्रीनंतर राहुरी परिसरातून सीबीआयच्या नाशिक युनिटने त्याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान धनंजय लोखंडे याच्या संपर्कात बिबवेवाडीतील मनीषा वाघमारे (वय 47, रा. सुखसागर, बिबवेवाडी) असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यानुसार बुधवारी (दि.13) सकाळी आठच्या सुमारास पोलिसांनी तिला संशयित म्हणून ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशी केल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास तिला ‘सीबीआय’च्या ताब्यात देण्यात आले. मनीषा वाघमारे ही व्यवसायाने ब्युटीपार्लरचालक असून, तिचा पती दंतचिकित्सक असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून ती धनंजय लोखंडेच्या संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. प्राथमिक चौकशीत ती विद्यार्थ्यांना लोखंडेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
तपासात समोर येत असलेल्या माहितीनुसार, पुण्यातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारे एक स्वतंत्र ‘नेटवर्क’ कार्यरत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. सीबीआय, पुणे पोलिसांची गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांकडून मोबाईल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार, बँक खात्यांची माहिती आणि आरोपींमधील संपर्क यांची पडताळणी सुरू असून, या प्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
...वाघमारेच्या खात्यावर आले पैसे
पोलिसांनी वाघमारेचा मोबाईल फोन जप्त केला असून, त्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. नीट परीक्षेच्या कालावधीतच तिच्या खात्यात सुमारे दहा लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. हे पैसे विद्यार्थ्यांकडून किंवा त्यांच्या पालकांकडून घेण्यात आले होते का, याचा तपास आता पोलिस करीत आहेत. तसेच, तिने मोबाईलमधील काही मेसेज हे डिलीट केले आहेत. लोखंडे आणि वाघमारेचे मेसेज होते. त्यामुळे तिने नेमके कोणते मेसेज डिलीट केले याचा देखील तपास यंत्रणा करत आहेत.
...विद्यार्थी शोधण्याची जबाबदारी सोळंकीकडे?
दरम्यान, याच प्रकरणात पुणे पोलिसांनी बुधवारी दुपारी मांजरी परिसरातून शेषराव सोळंकी या तरुणाला ताब्यात घेतले आहे. तो नामांकित महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या (सायबर सुरक्षा) द्वितीय वर्षात शिक्षण घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सोळंकीकडे ‘नीट’ परीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांचा शोध घेणे, त्यांच्याशी संपर्क साधणे अशी जबाबदारी होती का, त्यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत. लोखंडे याने सोळंकी याला ‘नीट’ परीक्षेच्या तीन-चार दिवस अगोदर नीट परीक्षेचा पेपर आपल्याकडे येणार आहे असे सांगितले होते. लोखंडे यानेच सोळंकी याला पेपर विकत घेणारे ग््रााहक (विद्यार्थी) शोधण्यास सांगितले होते.
लोखंडे अन् महिला वाघमारे होते संपर्कात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित महिला मनीषा वाघमारे आणि धनंजय लोखंडे या दोघांचा परिचय सोशल मीडियाच्या माध्यमातून झाला होता. वाघमारेच्या मुलीला वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा होता. त्यामुळे ती त्यासाठी प्रयत्न करत होती. त्यावेळी लोखंडे याने वाघमारे यांना कोणाला वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल, तर आपण मिळवून देऊ असे सांगितले होते. तेव्हापासून दोघे एकमेकांच्या संपर्कात होते.
‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात संशयावरून मनीषा वाघमारे या महिलेसह दोघांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशी करून महिलेला ‘सीबीआय’च्या ताब्यात दिले आहे, तर शेषराव सोळंकी या तरुणाकडे चौकशी केली जात आहे.
अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर