

रवी कोपनर
महापालिकेच्या आगामी निवडणुकीत बालाजीनगर-आंबेगाव-कात्रज हा भाग (क्र. 38) सर्वात मोठा असून, तो एकमेव पाच सदस्यीय आहे. यात अर्धे मतदार जुने, तर अर्धे मतदार नव्याने समाविष्ठ झालेल्या सहा गावांतील आहेत. तब्बल नऊ माजी नगरसेवकांसह डझनभर माजी सरपंच-उपसरपंच निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.
प्रभागाची लोकसंख्या 1 लाख 23 हजार 981 इतकी आहे. महापालिकेचे जे 41 प्रभाग आहेत. त्यामधील सर्वात मोठा आणि पाच सदस्यांचा एकमेव प्रभाग आहे. आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीतील राष्ट्रवादी काँग््रेास (अजित पवार), भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) हे प्रमुख पक्ष समोरासमोर भिडणार असून उमेदवारी न मिळणाऱ्या ताकदीच्या इच्छुकांना गळाला लावून महाविकास आघाडी आव्हान देण्याच्या तयारीत आहे. 2017 मधील महापालिका निवडणुकीत जुन्या प्रभागांतून राष्ट्रवादी काँग््रेासचे दत्तात्रय धनकवडे, प्रकाश कदम, युवराज बेलदरे, अमृता बाबर, स्मिता कोंढरे, भाजपच्या राणी भोसले व मनीषा कदम आणि मनसेकडून वसंत मोरे हे विजयी झाले होते.
खडकवासला, पुरंदर-हवेली आणि हडपसर या तीन विधानसभा मतदारसंघांच्या भागांचा या प्रभागात समावेश आहे. महायुतीतील राष्ट्रवादी काँग््रेास (अजित पवार गट), भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे प्रत्येकी एक आमदार या मतदारसंघांतून आहेत. भाजपकडे एक विधानपरिषद आमदार आणि एक माजी आमदार यांची ताकद या भागात आहे. या प्रभागात 2017 मधील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग््रेासचा वरचष्मा होता. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चार माजी नगरसेवकांसह निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. गत निवडणुकीत भाजपने कडवे आव्हान देत दोन नगरसेवक निवडून आणले होते. तसेच अभिजित कदम यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला होता.
माजी नगरसेविका अमृता बाबर यांचे दीर नमेश बाबर यांनी राष्ट्रवादी काँग््रेासशी फारकत घेत कात्रज विकास आघाडी स्थापन केली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. तसेच माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग््रेासच्या विभाजनानंतर स्मिता कोंढरे यांनी शरद पवार गटात राहणे पसंत केले आहे.या प्रभागात महापालिकेत नव्याने समाविष्ठ झालेल्या सहा गावांसह अर्धे मतदार हे पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातील आहेत. या मतदारसंघातून शिवसेनेचे (शिंदे गट) विजय शिवतारे हे आमदार आहेत. तसेच नमेश बाबर यांनीही शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. शिवसेनेच्या (ठाकरे गट) माजी नगरसेविका कल्पना थोरवे आणि राष्ट्रवादी काँग््रेासमधून माजी उपसरपंच अनिल कोंढरे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे पक्षाचे बळ वाढले आहे. शिवसेना ठाकरे गटाकडेही माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्यासारखा तगडा चेहरा आहे. त्यामुळे मोरे हे राष्ट्रवादी काँग््रेास (शरद पवार गट) आणि काँग््रेाससोबत आघाडी करून आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. महायुती न झाल्यास राष्ट्रवादी काँग््रेास (अजित पवार गट), भाजप व शिवसेना (शिंदे गट) आणि महाविकास आघाडी, अशी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तर भाजपकडून माजी नगरसेविका राणी भोसले, माजी सरपंच अरुण राजवाडे, व्यंकोजी खोपडे, संदीप बेलदरे, असे अनेक मात्तबर इच्छुकांची यादी आहे, त्यामुळे उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच होणार आहे.
मागील निवडणुकीत माजी नगरसेवकांनी प्रभागात विकास प्रकल्प व मूलभूत सुविधांची कामे केली असली, तरी पाणीपुरवठा आणि वाहतुकीसह अनेक समस्या सोडविण्यात त्यांना अपयशही आले आहे. यामुळे मतदारांचा कौल कोणाकडे वळणार? त्यातच नव्याने समाविष्ठ झालेल्या गावांतील मूलभूत समस्यांची वानवा असल्याने तेथील मतदार कोणाला साथ देणार? यावर निकाल अवलंबून असणार आहे.
पॅनल जुळवा-जुळवीचे गणित पक्षांना जमेना
महायुतीतील राष्ट्रवादी काँग््रेास (अजित पवार गट), भाजप आणि शिवसेनेकडे (शिंदे गट) इच्छुकांची संख्या मोठी आहे. या प्रभागात नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रत्येकी एक जागा असल्याने सर्वच पक्षांत उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच होणार आहे. उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करून इतर पक्षांत जाण्यासाठी छुप्या पद्धतीने संपर्क साधला जात असल्याचीही चर्चा सुरू आहेत. यामुळे तिकीट वाटप करताना सर्वच पक्षांना कसरत करावी लागणार आहे. तसेच पॅनल जुळवा-जुळवीचे गणित करणेही अवघड होऊन बसले आहे.
या प्रभागातील आरक्षण
‘अ’ गट : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) ‘
ब’ गट : नागरिकांचा मागास प्रवर्ग
‘क’ गट : सर्वसाधारण प्रवर्ग (महिला)
‘ड’ गट : सर्वसाधारण प्रवर्ग (महिला)
‘इ’ गट : सर्वसाधारण प्रवर्ग
विविध पक्षांतील इच्छुक उमेदवार
राष्ट्रवादी काँग््रेास (अजित पवार गट) : दत्तात्रय धनकवडे, प्रकाश कदम, युवराज बेलदरे, विकास फाटे, पल्लवी जगताप, सुनील मांगडे, प्राजक्ता पन्हाळकर, राजेंद्र बर्गे.
भाजप : राणी भोसले, व्यंकोजी खोपडे, अरुण राजवाडे, संदीप बेलदरे,डॉ. वैभव ताड, अभिजित कदम, संतोष ताठे, डॉ. सुचेता भालेराव, रोहिदास चोरघे, विठ्ठल चोरघे, समीर धनकवडे, अश्विनी चिंधे, अर्चना मांगडे, प्रिया रासकर, महेश किवडे.
शिवसेना (शिंदे गट) : स्वराज बाबर, कल्पना थोरवे, अनिल कोंढरे, श्रीकांत लिपाणे, वनिता जांभळे, ज्योती भोगावडे.
शिवसेना (ठाकरे गट) : वसंत मोरे.
राष्ट्रवादी काँग््रेास (शरद पवार गट) : स्मिता कोंढरे, सुमित काशीद, राणी बेलदरे, गीतांजली जाधव.
काँग्रेस : अस्मिता रानभरे, संजय अभंग. आप : प्रदिप माने, नौशाद अन्सारी, महादेव कोपरे. आरपीआय (खरात गट) : राजाभाऊ कांबळे.