

पुणे: गावरान सीताफळाचा हंगाम संपल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात गावरानची आवक रोडावली आहे. तर, गोल्डन सीताफळाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मागणी कमी असल्याने गोल्डनच्या दरात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे.
बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने कलिंगड आणि खरबूजाच्या भावात किलोमागे दोन ते तीन रुपयांनी वाढ झाली आहे. याखेरीज, लिंबूच्या 15 ते 20 किलोंच्या गोणीमागे शंभर रुपयांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
थंडीमुळे राज्यासह परराज्यातील खरेदीदारांनी रसदार फळांच्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. बाजारात बहुतांश फळांची आवक जावक कायम असल्याने त्यांचे गत आठवड्यातील दर टिकून होते. मार्गशीर्षमुळे बोरांना चांगली मागणी असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले.
फळबाजारात रविवारी (दि. 7) मोसंबी 50 ते 60 टन, संत्रा 25 ते 30 टन, डाळिंब 30 ते 35 टन, पपई 10 ते 15 टेम्पो, लिंबाची सुमारे एक हजार ते बाराशे गोणी, कलिंगड 7 ते 8 टेम्पो, खरबूज 4 ते 5 टेम्पो, अननस 6 ट्रक, बोरे 400 ते 450 पोती तर गोल्डन सीताफळाची 15 ते 20 टन आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : 200-400, मोसंबी : (3 डझन) : 100-280, (4 डझन) : 50-130, संत्रा : (10 किलो) : 400-1000, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 80-250, आरक्ता : 40-80, गणेश : 5-25, कलिंगड : 10-30, खरबूज : 25- 38, पपई : 10-25, चिक्कू (दहा किलो) : 100-600, पेरु (20 किलो) : 300-500, अननस (1 डझन) : 100-600, गोल्डन सीताफळ (1 किलो) : 5-25, बोरे (10 किलो) : चमेली 250-320, चेकनट 700-800, उमराण 70-90, चण्यामण्या 600-700.