

पुणे: नवीन वर्ष, नवीन संकल्प अशा मानसिकतेतून अनेक जण 1 जानेवारीपासून व्यायाम सुरू करण्याचा निश्चय करतात. मात्र, नववर्षाच्या पूर्वसंध्येला झालेल्या सेलिबेशननंतर पहिल्याच दिवशी संकल्प मोडीत निघतो. नवीन वर्षाची वाट पाहण्यापेक्षा आजपासूनच व्यायामाला सुरुवात करा, असा सल्ला फिटनेसतज्ज्ञ देत आहेत. फिटनेस हा तारखेवर अवलंबून नसून सवयींवर आधारित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
सध्या कामातील ताणतणाव, बैठी जीवनशैली, मोबाईल व स्क्रीनचा वाढलेला वापर, यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब, पाठदुखी, गुडघेदुखी यांसारख्या समस्या वाढत आहेत. अशा पार्श्वभूमीवर नियमित व्यायाम ही गरज बनली आहे. मात्र, अनेक जण जानेवारीपासून सुरू करू, थोडा वेळ मिळाला की बघू, असे म्हणत व्यायाम पुढे ढकलतात. मात्र, आरंभशूर होण्यापेक्षा ’कल करे सो आज, आज करे सो अब’ असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
व्यायाम सुरू करण्यासाठी सोप्या टिप्स
दिवसातून किमान 20-30 मिनिटे हालचाल आवश्यक
सुरुवातीला चालणे, स्ट्रेचिंग किंवा योगासने करा
अचानक जड व्यायाम टाळा; हळूहळू वेळ वाढवा
आठवड्यातून किमान 5 दिवस व्यायामाची सवय लावा
मोबाईल, टीव्हीचा वेळ कमी करून शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहा
नियमित व्यायामाचे फायदे
वजन नियंत्रणात राहते
मधुमेह, रक्तदाबाचा धोका कमी होतो
पाठदुखी, गुडघेदुखीमध्ये आराम मिळतो
तणाव कमी होऊन मानसिक आरोग्य सुधारते
झोपेची गुणवत्ता आणि कामाची क्षमता वाढते
व्यायाम सुरू करण्यासाठी परफेक्ट वेळ कधीच येत नाही. दिवसातून फक्त 20-30 मिनिटे चालणे, स्ट्रेचिंग किंवा हलका व्यायाम आजपासून सुरू केला तरी त्याचा शरीरावर आणि मनावर सकारात्मक परिणाम दिसतो. सातत्य हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. एक-दोन दिवस जोरदार व्यायाम करून आठवडाभर थांबण्यापेक्षा रोज थोडा व्यायाम फायदेशीर ठरतो. घरच्या घरीही अनेक सोपे व्यायाम करता येतात. चालणे, जिने चढणे, सूर्यनमस्कार, योगासने किंवा प्राणायाम यामुळे फिटनेस राखता येतो.
अमोल देशमुख, फिटनेस ट्रेनर
व्यायाम हा केवळ वजन कमी करण्यासाठी नसून रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी आणि झोप सुधारण्यासाठीही आवश्यक आहे. ’नवीन वर्ष’ हे केवळ निमित्त असू शकते; खरा बदल आजच्या निर्णयातून सुरू होतो. त्यामुळे नवीन वर्षाची वाट न पाहता आजपासूनच छोट्या पावलांनी फिटनेसकडे वाटचाल करा. सातत्य राखले तर आरोग्यदायी जीवनशैली निश्चितच शक्य आहे. यासाठी संतुलित आहारावरही लक्ष केंद्रित करा.
पूजा कुलकर्णी, आहारतज्ज्ञ आणि फिटनेस सल्लागार