

पुणे: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मुंढव्यातील ताडीगुत्ता चौक परिसरातून बनावट स्कॉच मद्याचा साठा जप्त केला आहे. त्याच्यावर ‘फक्त सैन्याकरिता राखीव’ असे लिहिण्यात आले होते. बनावट स्कॉचच्या बाटल्या, कारसह 5 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी प्रथमेश विजय कान्हेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सोमवारी (दि. 22) दुपारी उत्पादन शुल्क विभागाचे पथक मुंढवा परिसरात गस्तीवर होते. त्या वेळी त्यांना कान्हेकर याच्या वाहनातून बनावट स्कॉच मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.
तर दुसऱ्या कारवाईत रिक्षातून बनावट विदेशी दारूची वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साईज) तळेगाव दाभाडे पथकाने उघडकीस आणला. मंगळवारी (दि.23) दुपारी लोणावळा ग््राामीण परिसरातील येळसे फाटा (कडधे) येथे ही कारवाई करण्यात आली. दोन वेगवेगळ्या कारवाईत एक्साईज पथकाने 15 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त करत तिघांना अटक केली.
रामदास हरिभाऊ शेळके, चेतन दत्तात्रय खांडेकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाचे पथक शहरासह जिल्ह्यात गस्तीवर आहे. अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 21 पथके तैनात केली आहेत. दरम्यान, तळेगाव दाभाडे पथक गस्तीवर असताना येळसे भागात रिक्षातून वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून रिक्षा ताब्यात घेतला. तपासणीत रिक्षामध्ये बनावट विदेशी मद्याचा मोठा साठा आढळून आला. मॅकडॉल्स व्हिस्कीच्या 144 बाटल्या (3 बॉक्स), इंपिरियल ब्लूच्या 144 बाटल्या (3 बॉक्स) आणि रॉयल स्टॅगच्या 192 बाटल्या (4 बॉक्स) असा एकूण 3 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शेळके याला अटक केली.
या गुन्ह्याच्या पुढील तपासात तळेगाव दाभाडे पथकाने कोथरूडमधील अहिल्यानगर चौक परिसरातील श्रीतेज पान स्टॉल अँड जनरल स्टोअर्स येथे छापा टाकला. येथे मद्य वाहतुकीसाठी वापरलेली कार, बनावट मद्य बाटल्यांत भरण्यासाठी वापरली जाणारी स्टील टाकी, गोवा राज्यनिर्मित क्लासिक व्हिस्की, बनावट ब्लेंड, कॅप, लेबल व इतर साहित्य जप्त केले. येथून खांडेकरला अटक केली असून 6 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे, उपअधीक्षक सुजित पाटील, संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक उत्तम आव्हाड, दुय्यम निरीक्षक प्रशांत रुईकर, प्रवीण घाडगे, आरती तांदळे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
अवैद्य मद्यनिर्मिती, वाहतूक, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी 21 पथके तैनात करण्यात आली आहेत. यापूर्वी अशाप्रकारच्या गुन्ह्यात गुंतलेले सराईत यांच्या हालचालीवर पाळत ठेवली जात आहे. रात्रगस्त, त्याचबरोबर वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे. बनावट मद्याबाबतसुद्धा विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
अतुल कानडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे