

पुणे: ख्रिसमस सणाच्या पूर्वसंध्येला शहरातील विविध परिसरांमधील चर्च विद्युत रोषणाईने नटली. ख्रिसमसनिमित्त आदल्या दिवशीपासूनच चर्चमध्ये धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. रात्री वॉच नाईट उपासना, सकाळी ख्रिस्तजन्माची भक्ती, प्रार्थना असे विविध उपक्रम दिवसभर आयोजित करण्यात आले आहेत.
येशू ख्रिस्ताच्या जन्मदिनानिमित्त चर्चमध्ये आकर्षक रोषणाई, तारे, क्रिब (येशू जन्मदृश्य) आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे. कॅम्प, शिवाजीनगर, हडपसर, कोंढवा, शंकरशेठ रोड, वडगाव शेरी अशा विविध भागांतील चर्चमध्ये विशेष प्रार्थना, भक्तिगीते आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभांना मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या प्रेम, शांती आणि बंधुभावाच्या संदेशाबद्दल आयोजित प्रवचनांना समाजबांधवांनी हजेरी लावली. तसेच आनंदगीते (कॅरेल सिंगिंग), लघुनाट्य, येशूजन्मकथांचे सादरीकरण यामुळे चर्च परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
ख्रिसमसच्या निमित्ताने केक, मिठाई, सजावटीच्या वस्तू आणि भेटवस्तूंच्या विक्रीतही वाढ झाली आहे. बाजारपेठा, मॉल्स आणि बेकरींमध्ये विशेष सजावट करण्यात आली असून, ग््रााहकांची लगबग दिसून येत आहे. अनेक कुटुंबे सामाजिक उपक्रमांतून गरजूंसाठी अन्नवाटप, वस्त्रदान आणि मदतकार्य करताना दिसत आहेत. ख्रिसमस हा केवळ धार्मिक सण नसून, प्रेम, सौहार्द आणि एकात्मतेचा संदेश देणारा उत्सव आहे. पुणे शहरात सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत हा सण आनंदात साजरा करण्याची तयारी केली असून, शहरभर आनंद आणि शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
चर्चमध्ये ख्रिस्तजन्मोत्सवानिमित्त आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ख्रिस्तजन्माची भक्ती, उपासना यांसह नववर्ष पूर्वसंध्या भक्ती, प्रभूभोजन, महिला मंडळ व तरुण संघाचा कार्यक्रम अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.
रेव्ह. प्रशांत गोर्डे, प्रिस्ट इनचार्ज, ख्रिश्चन फेलोशिप सेंटर चर्च, वडगाव शेरी
चर्चला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. चर्चमध्ये भक्तिभावाचे वातावरण आहे. वॉच नाईट उपासना, ख्रिस्तजन्माची विशेष उपासना, नूतन वर्षाची उपासना, वर्षाचे प्रथम प्रभू भोजन असे कार्यक्रम आठवडाभर होणार आहेत.
रेव्ह. सुधीर चौहान, ख्रिस्ती मंडळ चर्च, ताडीवाला रस्ता