

पुणे: पुण्यात डीजेच्या विरोधात हळूहळू लोकचळवळ उभी होत आहे. माझाही डीजेबंदीबाबत लढा सुरू राहणार असून, नागरिकांच्या पातळीवर सुरू झालेल्या विरोधाला अनुसरून संघटित लढा उभारणार असल्याचा निर्धार ध्वनिप्रदूषणाबाबत लढा देणारे विद्यानंद बापट यांनी शुक्रवारी माध्यमांसमोर व्यक्त केला.
दरम्यान, चळवळीबाबत सांगताना त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बाबतीत जे घडले, ते माझ्याबाबतीतही घडू शकते, अशी भीती व्यक्त केली. जर मी जगलो, तर गुडलकपासून महापालिकेपर्यंत निघणाऱ्या पहिल्या लोकचळवळीतील मोर्चात मी आवर्जून सहभागी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सव आणि इतर सण-उत्सवांतील डीजे आणि ध्वनिप्रदूषणाबाबत परखड भूमिका मांडल्यानंतर गुरुवारी बापट यांना मारहाण झाली. त्यानंतर शुक्रवारी बापट यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांसमोर भूमिका मांडली.
बापट म्हणाले की, विचारांची लढाई ही विचारांनी लढायची असते. मुद्द्याचे उत्तर गुद्द्यांनी नाही. ज्यांना हे कळत नाही, त्यांच्यासोबत युक्तिवाद करून उपयोग नाही. त्यासाठी पोलिस यंत्रणा सक्षम आहे. ध्येयपथावर अविचलपणे चालायचे असते. माझे साध्य उदात्त असल्याने मला विचलित करण्याचे प्रयत्न होत आहेत. परंतु, मी विचलित होणार नाही. पोलिसांनी लवकर सुरक्षा पुरवली, याबाबत मी समाधानी आहे.
तसेच, हिंदूंच्या किंवा कोणत्याही धर्माच्या सण-उत्सवांना विरोध नाही, तर सार्वजनिक ठिकाणी धुडगूस घालण्याला, ध्वनिप्रदूषण करण्याला, लोकांना वेठीस धरणाऱ्या घटनांना आमचा विरोध आहे. काळानुसार उत्सवांचे स्वरूप बदलणे आवश्यक आहे. मिरणुका काढायच्याच असतील, तर शहरातील वाहतूक विस्कळीत न करता शहराबाहेरील मोठ्या रस्त्यावर एका लेनमधून त्या काढण्याचा पर्याय त्यांनी सुचवला. ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी काही मंडळांनी मिरवणुका न काढण्याचा निर्णय घेतला, तर तोदेखील स्वीकारार्ह मार्ग असल्याचे बापट यांनी सांगितले.
इच्छाशक्ती लागते
नागपूरमध्ये डीजेबंदीचा निर्णय घेतला जातो, ही चांगली गोष्ट आहे. परंतु, पुण्यात डीजेबंदी न होता सांस्कृतिक पुणे म्हणून टेंबा मिरवतात. डीजे बंद करण्यासाठी इच्छाशक्ती लागते, असे सांगत त्यांनी सरकार आणि प्रशासनावर संधान साधले.
ध्वनीविषयक मार्गदर्शक तत्त्वांना आव्हान
गणेशोत्सवाला विरोध असल्याचा आरोप करणाऱ्यांना कायद्यातील पळवाटा आहेत. त्यातच प्रामुख्याने ध्वनीविषयक मार्गदर्शक तत्त्वांना थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे. उत्सव, ध्वनिप्रदूषण आणि नदीप्रदूषण या प्रश्नांकडे स्वतंत्रपणे पाहण्याची गरज आहे. पीओपीऐवजी शाडूच्या मूर्तीचा वापर, पर्यावरणविषयक बदल कालसुसंगतपणे स्वीकारले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.