

पुणे: ऑगस्ट महिन्यात मान्सूनच्या पावसाच्या कमी हजेरीमुळे खरिपातील पिके सध्या काही भागांत अडचणीत आल्याचे चित्र आहे. पिकांच्या वाढीसाठी पावसाची नितांत आवश्यकता असून, पुरेशा पाण्याअभावी पिकांवर ताण दिसून येत आहे, तर काही भागांत खरीप पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याची माहिती कृषी आयुक्तालयातून देण्यात आली.
पावसाचा खंड कालावधी जसा वाढत जाईल, तसा खरीप पिकांच्या उत्पादनक्षमतेवर विपरित परिणाम दिसण्याची शक्यताही वर्तविण्यात आली. भात पीक हे सध्या फुटव्याच्या अवस्थेत असून, फुटव्यांची संख्या चांगली दिसत आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे भात पिकाची वाढ चांगली दिसत आहे. अद्याप कोणत्याही कीड व रोगाचे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाले नसल्याचे दिसून येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ऑगस्टमधील कमी पर्जन्यमानाच्या भागात भात, सोयाबीन, भुईमूग, मका, ज्वारी या पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार ओलाव्याचा ताण, वाढ खुंटणे व उत्पादनक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड तालुक्यात व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यात कमी पर्जन्यमानामुळे तुरळक ठिकाणी पिकावर ताण दिसून येत आहे. चालू आठवड्यात पावसाची आवश्यकता आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात शंखी गोगलगायीचा तसेच राजापूर तालुक्या्त कडा-करपा रोगाचा व निळ्या भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याठिकाणी कृषी विभागाकडून कीडरोग व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. इतरही जिल्ह्यांत पावसाअभावी पिकांची अशीच स्थिती आहे.
पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्वेकडील पिके अडचणीत
पुणे जिल्ह्यातील भातक्षेत्रात पाऊस समाधानकारक असून, पीक परिस्थिती चांगली आहे. पूर्वेकडील विशेषतः इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर तालुक्यात ऑगस्टमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस आहे. या भागातील मूग, उडीद, बाजरी, सोयाबीन इत्यादी पिकांना पावसाचा ताण जाणवत आहे. चांगला पाऊस न झाल्यास खरीप पिकांच्या उत्पादकतेत घट येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
राज्यात जूनमध्ये पाऊस कमी राहिला आणि जुलैमध्ये सरासरीच्या १३१ टक्के पाऊस होऊन पेरण्यांना गती आली. मात्र, ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या ५३ टक्केच पाऊस झाला असून, पावसात खंडही अधिक राहिलेला आहे. त्यामुळे खरीप पिकांवर ताण आलेला आहे. ढगाळ हवामानामुळे पिके तग धरून असली तरी येत्या आठवड्यात सर्वदूर पावसाची नितांत गरज आहे.
वैभव शिंदे, मुख्य सांख्यिक, कृषी आयुक्तालय, पुणे