Pune Congress Decline: काँग्रेस पक्षा, तू राजा होतास… आज पुण्यात केविलवाणा का झालास?

महापालिकेतील सुवर्णकाळापासून अस्तित्वाच्या लढ्यापर्यंतचा काँग्रेसचा प्रवास
Pune Congress Decline
Pune Congress DeclinePudhari
Published on
Updated on

सुनील माळी

काँग्रेस पक्षा, तू पुण्याच्या राजकारणातला राजा होतास... महापालिकेच्या निवडणुकीत तुझं तिकीट मिळालं की निवडणुकीच्या औपचारिकतेनंतर लगेचच पहिलं पाऊल महापालिकेत टाकायचं अन्‌‍ दुसरं पाऊल कुठल्याही पदाच्या दिशेनं, असंच इथं मानलं जात होतं... तुझं तिकीट मिळविण्यासाठी काँग्रेस भवनसमोर कार्यकर्त्यांचे जथ्थेच्या जथ्थे घेऊन इच्छुक गर्दी करत... पण आता..? आता तू पालिकेतला सर्वांत केविलवाणा पक्ष ठरला आहेस. काँग्रेस भवनसमोर एकेकाळी होणारी गर्दी आता भाजपच्या कार्यालयासमोर होतेय अन्‌‍ तू अर्ज स्वीकृतीसाठी मुदतवाढ देत आहेस... कोण होतास तू..., काय झालास तू ..?

Pune Congress Decline
Yerwada Jail Assault: येरवडा कारागृहात कैद्यावर फरशीने जीवघेणा हल्ला

महापालिकेच्या स्थापनेनंतरच्या 13 निवडणुकांपैकी 5 निवडणुका स्वत:च्या ताकदीवर किंवा 1999 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीनं तू जिंकल्यास. त्यातल्या 1968, 1992 आणि 1997 या निवडणुकांमध्ये तुझा विजय दणदणीत होता, तर 2002 अन्‌‍ 2012 मधल्या निवडणुकांत तू राष्ट्रवादीशी आघाडी करून सत्तेत आलास. स्वातत्र्यप्राप्तीनंतरच्या पहिल्या काही निवडणुकांत नागरी संघटनेचं वर्चस्व होतं, पण नंतर तू आपला जम बसवत गेलास. त्याची पहिली झलक दिसली ती 1968 मध्ये, पण खऱ्या अर्थानं तू फॉर्ममध्ये आलास ते 1992 मध्ये. तेव्हापासून पुणे पॅटर्नचा अडीच वर्षांचा अपवाद वगळला, तर 2012 पर्यंतच्या तब्बल वीस वर्षांच्या निवडणुकांत तुझा तसंच नंतरच्या टप्प्यात तुझ्याबरोबरीनं तुझा चुलतभाऊ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचाही दबदबा होता, तो तुझा सुवर्णकाळच होता. ‌‘सबसे बडा खिलाडी‌’ नामाभिधान मिरवणारे सुरेश कलमाडी आणि दिल्लीत पाय रोवून असले तरी गल्लीतही दांडगा संपर्क असलेले शरद पवार यांच्या नेतृत्वानं त्या टप्प्यात पुणे काँग्रेस नावारूपाला आली.

Pune Congress Decline
Wanwadi Society Fire: वानवडीतील सोसायटीच्या मीटर बॉक्सला आग; पार्किंगमधील चार वाहने जळून खाक

तू लढवलेल्या पुणे महापालिकेच्या त्या निवडणुका आणि त्यातलं तुझं वैभव यांच्या आठवणी आता दिनवाण्या दिसणाऱ्या काँग्रेस भवनाला येताहेत. काँग्रेस पक्षा, तू म्हणजे ‌‘पुण्यातल्या कार्यकर्त्यांच्या लाटांमागून लाटा‌’ असाच अनुभव येत असे. महापालिकेची निवडणूक जाहीर झाली की काँग्रेस भवनातली टेबलं अन्‌‍ कपाटं इच्छुकांच्या अर्जांच्या ढिगांनी भरून जात. मग उमेदवार निवड समिती दिल्लीहून जाहीर होई. त्या कार्ड कमिटीच्या सदस्यांना कसला मान असे? इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम सुरू झाला, की सकाळपासूनच काँग्रेस भवनचं आवार गर्दीनं फुलून जाई. इच्छुक आपल्या समर्थकांचे जथ्थे घेऊन शक्तिप्रदर्शन करीत. ट्रक, टेम्पो, रिक्षा, स्कूटर, मोटारसायकल अशा वेगवेगळ्या वाहनांनी कार्यकर्ते येत आणि आपल्या इच्छुकांच्या घोषणांनी आवार दणाणून सोडत. मुलाखतींचा हा कार्यक्रम अनेक दिवस चाले. त्यानंतर कार्ड कमिटी आपल्या शिफारशी प्रदेश शाखेकडे पाठवत. तिथं झालेल्या बैठकीत उमेदवारांबाबत शक्यतो सर्वांचं एकमत होत नसे. मग प्रत्येक जागेसाठी दोन-तीन जणांचं पॅनेल करून ते वरिष्ठांकडं पाठवलं जाई.

Pune Congress Decline
Maval Suspension Protest: मावळ प्रकरणातील अधिकाऱ्यांचे निलंबन मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन

अगदी दिल्लीपर्यंत मंजुरीसाठी ही यादी जात असे. तिथपर्यंतही वशिला लावणारेही काही बहाद्दर असत. ‌‘अगदी ऐनवेळी माझं नाव दादांनी- साहेबांनी-बाईंनी कसं घुसवलं?‌’ या बहादुरीच्या कथा नंतर तिखटमीठ लावून सांगितल्या जात. प्रत्येक नेता आपल्या समर्थकांना तिकिटं मिळावीत, यासाठी प्रयत्न करे. दुसऱ्या नेत्याच्या कार्यकर्त्यांना पाडण्यासाठी आपल्या समर्थकाच्या बंडखोरीला बळ दिलं जाई. अशी पाडापाडी करूनही काँग्रेसच सत्तेवर येणार, ही घमेंड असल्यानंच नेते बंडखोरीला ताकद देत असत. मतदारांचा सणसणीत पाठिंबा आणि कार्यकर्त्यांच्या लाटा, यामुळंच काँग्रेसला 1992 नंतरच्या निवडणुकांत यश मिळत गेलं. 1992 मध्ये पक्षाला 52 जागा, 1997 मध्ये 67 जागा, 2002 मध्ये 61 जागा अशा पहिल्या क्रमांकाच्या घवघवीत जागा तुला मिळत गेल्या. प्रमुख विरोधक म्हणवणारे भाजप-शिवसेना पंधरा-वीस जागांमध्येच खेळत राहिले.

Pune Congress Decline
Maharashtra Cold Wave: महाराष्ट्रात सलग दहा दिवसांची कडाक्याची थंडी; गोंदिया ८.४, पुणे ९.४ अंशांवर

मात्र, काँग्रेस पक्षा, तुझ्या एकछत्री अमलाला ग्रहण लागायला सुरुवात झाली ती तुझ्या चुलतभावानं स्वतंत्र चूल मांडल्यानंतर. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची 1999 मध्ये स्थापना केली आणि पहिल्याच 2002 च्या निवडणुकीत तुला त्या नवीन बाळाची साथ घेऊनच सत्तेत यावं लागलं. राष्ट्रवादी काँग्रेसला 2002 मध्ये 22 जागा मिळाल्या, तर तुला गेल्या निवडणुकीच्या 67 जागांवरून काही जागांपर्यंत घसरावं लागलं, पण त्यानंतर राष्ट्रवादीचा खरा दणका तुला बसू लागला. 2007 ला तू 36 जागांपर्यंत रोडावलास आणि चक्क पंधरा वर्षांची सत्ताही तुला सोडावी लागली. राष्ट्रवादीनं भाजप-शिवसेनेशी केलेलं सख्य अवघी अडीच वर्षं टिकल्यानं राष्ट्रवादीनं सत्तेसाठी तुझी साथ घेतली खरी, पण 2012 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षा... तू 28 पर्यंत उतरल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस तुझा मोठा भाऊ बनला. त्यानंतर तर 2017 च्या नरेंद्र मोदी लाटेनं तुला केविलवाण्या 11 जागांपर्यंत उतरावं लागलं आहे.

Pune Congress Decline
Pune Lit Fest: एकात्मता भारतीय ज्ञान परंपरेचा केंद्रबिंदू – राज्यपाल आरिफ मोहम्मद खान

या पार्श्वभूमीवर आता चौदाव्या निवडणुकीत काँग्रेस, तू उतरतो आहेस. प्रत्येक वॉर्ड किंवा प्रभागात इच्छुकांची मोठीच्या मोठी रांग लागण्याची परंपरा असलेल्या तुला, हे काँग्रेस पक्षा, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी निवडणुकीआधीच आघाडी करावी लागते आहे. महापालिकेच्या 165 जागा तिघांत वाटल्या जाणार आहेत आणि ‌‘गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर कोणता पक्ष होता त्याला ती जागा‌’ असं सूत्र असल्याचं पक्षातील जाणकार सांगतात. तसं झालं तर गणित सरळ आहे... उपनगरांतल्या जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तर कसबा-कोथरूडसारख्या भागांतल्या जागा शिवसेनेला मिळणार, हे उघड आहे. प्रत्येक पक्षाला पन्नासच्या आसपास जागा मिळण्याची शक्यता असली तरी काही भागांतून काँग्रेस पूर्णपणानं उखडली जाण्याची भीती तुझ्या पक्षातीलच जाणकारांना वाटत आहे. शहरात वर्षानुवर्षं स्वत:च्या नावावर आणि वजनावर निवडून येणाऱ्या काही निवडक मातब्बरांच्या जागा टिकवल्या तरी खूप झालं, असं पक्षातील जुने कार्यकर्ते सांगतात. त्यातली काही मातब्बर भाजपप्रवेशाच्या संकेताकडं डोळे लावून बसल्यानं या जागांपैकी तरी किती राहतील? हा प्रश्न आहे...

Pune Congress Decline
Jeevangaurav Award: महाराष्ट्र फाउंडेशनचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार लीला चितळे आणि अरुण खोपकर यांना जाहीर

शरद पवार यांनी स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यामुळे पुणे काँग्रेसकडे असलेले त्यांचे लक्ष आणि नेतृत्व सहाजिकच नाहीसे झाले तसेच पुण्यात धडाडीने पक्षाचे नेतृत्व करणारे सुरेश कलमाडी यांच्यासारखे धडाकेबाज नेतृत्व दूर झाले. त्यानंतर सर्वमान्य असे नेतृत्व पुणे काँग्रेसला मिळाले नाही. असे नेतृत्व देण्याचा काहींनी प्रयत्न केला, परंतु त्यांना सर्वमान्यता मिळाली नाही. पुण्यातील तुझ्या अपयशाचे हेही महत्त्वाचे कारण ठरले.

काँग्रेस पक्षा, याला उपाय..? नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नी छेडण्यात येणाऱ्या आंदोलनांत नेत्यांनी केवळ फोटोपुरतं सहभागी होऊ नये तर लोकांमध्ये जाऊन त्यांची कामं करण्याची पक्षाची स्वातंत्र्यपूर्व परंपरा पुन्हा सुरू करायची गरज आहे. पक्षातल्या पदांच्या संधी त्याच त्या घिसापिट्या चार-पाच चेहऱ्यांना तू वर्षानुवर्षे देत आलास... त्या चेहऱ्यांना दूर करण्याचं आणि नव्या, सळसळत्या रक्ताच्या, नवपिढीशी नाळ असलेल्या तरुणांना जवळ करण्याचं धाडस तू दाखवशील का..? सत्ताधारी पक्ष कोणी का असेना, तो व्यापक जनहिताचा कारभार करीत नसेल आणि बेताल वागत असेल, तर त्याच्यावर टीकेचे आसूड ओढण्याचं कर्तव्य तू करशील का? अर्थात, त्यांच्या कारभारात तू सामील झाला नाहीस, तरच त्यांच्यावर आसूड ओढण्याचं नैतिक बळ तुझ्यात येईल आणि तेव्हाच हे घडेल... त्यासाठी हवा संयम... मग पाच वर्षं थांबावं लागलं तरी चालेल किंवा दहा वर्षं लागली तरी चालतील... भाजपनं जसं विरोधी बाकांवर वर्षानुवर्षांची तपश्चर्या केली तसा संयम तू दाखवलास, तर कधीतरी पक्षा, तुझं काँग्रेस भवन विजयाच्या गुलालानं, उत्साही मिरवणुकांनी अन्‌‍ कार्यकर्त्यांच्या सळसळीनं दणाणून जाईल... नवे उत्तमराव भूमकर त्यांचं स्वागत करतील...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news