

पुणे : येरवडा कारागृहातील बराकीत झालेल्या वादातून दोघा कैद्यांनी एकावर फरशीने हल्ला केला. कैद्याच्या डोक्यात फरशी घालून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल नागनाथ कांबळे (वय २८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी आकाश सतीश चंडालिया (वय ३०, रा. जय जवाननगर, येरवडा), दीपक संजय रेड्डी (वय २७, रा. इंद्रायणी काॅलनी, कामशेत) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कारागृह अधिकारी सचिन गुरव यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 15) सकाळी पावणेसातच्या सुमारास येरवडा कारागृहात घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंडालिया, रेड्डी, कांबळे हे सराईत आहेत. येरवडा भागातील एका खून प्रकरणात चंडालियाला अटक करण्यात आली होती.
येरवडा कारागृहातील सी. जे. विभागातील बराक क्रमांक १ मध्ये तिघांना ठेवण्यात आले आहे. चंडालिया, रेड्डी आणि कांबळे यांच्यात कारागृहात वाद झाले होते. सोमवारी (१५ डिसेंबर) सकाळी पावणेसातच्या सुमारास चंडालिया, रेड्डी यांनी कांबळे याच्यावर फरशीच्या तुकड्याने हल्ला केला. त्याच्या डोक्यात फरशीचा तुकडा घातला. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. आरडाओरडा ऐकून कारागृहातील रक्षकांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी चंडालिया आणि रेड्डी यांना रोखले. जखमी अवस्थेतील कांबळे याला तातडीने रग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच येरवडा विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांनी घटनास्थळी भेट दिली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक जराड तपास करीत आहेत.
दरम्यान, येरवडा कारागृहात यापूर्वी किरकोळ वादातून कैद्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या होत्या. कैद्यांमधील हाणामारी, चाेरून मोबाईल तसेच अमली पदार्थ आणणे, असे गैरप्रकार घडल्याने येरवडा कारागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यानंतर कारागृहातील हाणामारीच्या घटना कमी झाल्या तसेच गैरप्रकारही कमी झाल्याचे दिसून येते.